Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यालोकसभेच्या 'इतक्या' जागांवर पवार गटाचा दावा; विधानसभेच्या तयारीचेही संकेत

लोकसभेच्या ‘इतक्या’ जागांवर पवार गटाचा दावा; विधानसभेच्या तयारीचेही संकेत

मुंबई | प्रतिनिधी

राजस्थान, मध्यप्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमुळे इंडिया आघाडीची जागावाटपाची चर्चा थांबलेली असताना शरद पवार यांच्या नेतृत्वखालील राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी १२ ते १५ जागांवर दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना याबाबत माहिती दिली.

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत आम्ही १२ ते १५ जागा लढविण्यास इच्छुक आहोत. त्यासाठी आम्ही आतापासून तयारी सुरू केली असून पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर राज्यातील जागावाटपाची चर्चा वेगाने सुरू होईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीसाठी आमचे उमेदवारही जवळपास निश्चित झाले आहेत. बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे, शिरूरसाठी अमोल कोल्हे यांची नावे जवळपास निश्चित आहेत. तर रावेर, सातारा, कोल्हापूर, दिंडोरी, बीड आदीसाठी आम्ही उमेदवारांची चाचपणी करीत आहोत. लोकसभेनंतर विधानसभेसाठीही आम्ही तयारी करीत आहोत. यासाठी उमेदवारांची निवड करून त्यांना पक्षात घेतले जात आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थमंत्री देखील आहेत. त्यामुळे त्यांच्या गटातील आमदारांवर निधीवाटपात कोणता अन्याय होत असेल असे मला वाटत नाही. कोणत्या आमदाराला किती निधी दिला जातो हे काही सांगता येत नाही. निधीवाटप हा सरकारचा अंतर्गत विषय आहे. कोणत्या आमदाराला किती निधी दिला जातो याबद्दल काही सांगता येत नाही. निधी वाटपाबाबत आजकाल वेगळा पायंडा, प्रथा पडत आहेत. प्रत्येकालाच आपल्या मतदारसंघात जास्तजास्त निधी हवा असल्याचे दिसून येत आहे, असे जयंत पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या