Wednesday, June 10, 2026
Homeराजकीयशेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…

मुंबई । Mumbai

“ज्या देशात अन्नदाता सुखी नसतो, तो देश कधीच प्रगती करू शकत नाही. परंतु आज आपल्या महाराष्ट्रात दुर्दैवाने उलटे चित्र पाहायला मिळत आहे. खतासाठी शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री रांगा लावाव्या लागत आहेत, दुकानांबाहेर रस्त्यावर झोपावे लागत आहे. एवढी भीषण अवस्था होऊनही सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या घामाची किंमत कळत नाही, म्हणूनच आज बळीराजा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे,” अशा अत्यंत अस्वस्थ आणि तितक्याच आक्रमक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील आणि देशातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला.

- Advertisement -

बुधवारी मुंबईतील ऐतिहासिक वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या २७ व्या वर्धापन दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पक्षाचे नेते आणि राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार यांनी प्रामुख्याने शेतकरी, उपेक्षित समाज आणि देशाच्या परराष्ट्र धोरणावर अत्यंत महत्त्वपूर्ण भाष्य केले.

आपल्या भाषणाची सुरुवात करताना शरद पवार यांनी राज्यातील शेतकरी प्रश्नांवर थेट बोट ठेवले. ते म्हणाले, “आज राज्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडला असून पूर्णपणे कर्जबाजारी झाला आहे. कालच माझ्याकडे एक शासकीय यादी आली, ज्यामध्ये गेल्या अवघ्या आठ दिवसांत किती शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवले, याची धक्कादायक आकडेवारी आहे. ही परिस्थिती केवळ चिंताजनक नसून सरकारचे अपयश दाखवणारी आहे. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की, आपल्याला शेतकऱ्यांच्या या दुरवस्थेकडे डोळेझाक करता येणार नाही. जोपर्यंत या देशातील शेवटच्या घटकाला ‘हा देश माझा आहे आणि इथला राज्यकारभार माझ्या हिताचा आहे’ असे वाटत नाही, तोपर्यंत लोकशाहीला अर्थ नाही.”

पक्षाच्या आगामी ध्येयधोरणांची घोषणा करताना शरद पवार यांनी स्पष्ट केले की, राष्ट्रवादी काँग्रेस आता स्वस्थ बसणार नाही. “येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये आम्ही प्रमुख नेते एकत्र बसणार आहोत. समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र रणनीती आखली जाईल. जर सत्ताधाऱ्यांनी जनतेचे प्रश्न वेळेत सोडवले नाहीत, तर ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना योग्य दिशा दाखवण्याचे काम आम्ही करू. त्यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही, तर थेट रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष केला जाईल,” असा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला.

शेतकरी प्रश्नांसोबतच शरद पवारांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींचा संदर्भ देत केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावरही टीका केली. “गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि इतर देशांमध्ये युद्ध पेटले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या देशांवर अन्याय होतो, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि मदत करणे, हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे नेहमीच वैशिष्ट्य राहिले आहे. परंतु, सध्या आपली ही पारंपरिक परराष्ट्र नीती नीट सांभाळली जात नाही, असे चित्र आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

पक्षाच्या २७ व्या वर्षात पदार्पण करताना, “आता थांबायचे नाही, तर अधिक ताकदीने कामाला लागायचे आहे. आपले कर्तृत्व आणि कष्टाच्या जोरावर जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत,” असे स्पष्ट आवाहन त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले. शरद पवारांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आगामी काळात राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्या

Trimbakeshwar Darshan Scam : डिजिटल पुराव्यांच्या चक्रव्यूह; ३०० पानांच्या दोषारोपपत्रातून गैरव्यवहाराचे...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या रॅकेटप्रकरणी पोलिसांनी (Police) न्यायालयात (Court) तब्बल ३०० पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट)...