नाशिक | Nashik
अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ बड्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली आहेत. त्यांनी पक्षात उद्भवलेल्या बंडाच्या दुसऱ्याच दिवशी कराडमध्ये जाऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. तिथेच त्यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली होती. आज शरद पवार हे आज छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधील येवल्यात आपली पहिली सभा घेणार आहेत. नुकतेच शरद पवार यांचे नाशिक येथील हॉटेल एमराल्ड पार्क येथे आगमन झाले आहे.यावेळी पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
या वेळी त्यांना पत्रकारांनी अजित पवारांच्या भाषणावरुन प्रश्न विचारला. अजित पवार तुम्हाला रिटायर्ड व्हायला सांगत आहेत त्यावर काय सांगाल? असं विचारलं असता “मैं ना टायर्ड हूं, ना रिटायर्ड हूं, मैं तो फायर हुं..” अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली. तसेच वय होतं यात काही वाद नाही. पण तुम्ही प्रकृती चांगली ठेवली तर वय साथ देतं. त्यामुळे तो काही प्रश्न नाही. मोरारजी देसाई हे पंतप्रधान होते तेव्हा त्यांचं वय ८४ होतं. ते ज्या जोमाने काम करायचे तो अनुभव थक्क करणारा होता असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
…त्यामुळेच आम्ही भुजबळांना सेफ जागा दिली
शरद पवार पुढे म्हणाले की, १९८० साली मी जेव्हा काँग्रेस मधून बाहेर पडलो त्यावेळी नाशिक जिल्ह्याने आम्हांला जागा निवडून दिल्या. त्यावेळी लागोपाठ येवल्यातून जागा निवडून आल्या. नाशिकच्या सहकाऱ्यांनी छगन भुजबळ यांनी येवल्यातून लढावं असं सुचवलं होतं. भुजबळांना सेफ जागा द्यायची होती म्हणून येवल्याची जागा निवडली आणि तिथे आम्हाला यश आलं.