मुंबई | Mumbai
विधानसभेत अनपेक्षितपणे धक्का बसल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता आपले लक्ष महापालिकेच्या निवडणुकीवर केंद्रीत केले आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला हा गड कायम ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसल्याचे दिसून येतेय.
गुरुवारी (२३ जानेवारी) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या अंधेरी येथील क्रीडा संकुलात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत स्वबळाचे संकेत दिले.
काल झालेल्या मेळाव्यात बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले होते, निवडणुका लागल्या नाहीत मात्र जर तुमची तयारी पूर्ण झाली तर आपण नक्कीच कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार निर्णय घेऊ, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर आता महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन दिवसांपुर्वी जेव्हा उद्धव ठाकरे माझ्याशी यासंदर्भात सविस्तर बोलले. तेव्हा त्यांची ही विचारसरणी आहे हे कळले. मात्र त्यासंदर्भात उद्धव ठाकरेंची टोकाची भूमिका नाही, असे शरद पवारांनी सांगितले.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले, गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे माझ्याकडे चर्चेसाठी आले होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढाव्यात असा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा आग्रह असल्याचे त्यांनी मला सांगितले. मला त्यांचे मत टोकाचे वाटत नाही. आम्हाला आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना हा प्रश्न सामंजस्याने सुटावा, असे वाटत असल्याचे पवार यांनी सांगितले. कालही उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मेळाव्याला चांगली गर्दी होती, असे आवर्जून पवार यांनी अधोरेखित केले. उद्धव ठाकरे यांनी केवळ कालच्या भाषणातच नाही तर याआधीही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत स्वबळावर लढण्याचे संकेत दिलेले होते. त्यांनी कोणतीही टोकाची भूमिका घेतली नाही, असे पवार यांनी नमूद केले.
उध्दव ठाकरे काय म्हणाले होते?
काही दिवसातच महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील. मी सगळ्यांशी बोलत आहे, मुंबईसह नाशिक, नगर सगळ्यांशी बोलून झाले आहे. सगळ्यांचे मत एकटे लढा असे आहे. पण, अजून निवडणूक जाहीर झालेली नाही. आधी तुमची जिद्द बघूया. तुमची तयारी बघूया, ज्यादिवशी तुमची तयारी झाली ही खात्री पटेल. त्या दिवशी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीतील काही आमदार आणि खासदार आमच्याकडे प्रवेश करणार आहेत, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते. त्यांच्या दाव्यावरील प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी मिश्किल अंदाजात प्रत्युत्तर दिले. उद्योगमंत्री सामंत हे दावोसला उद्योग आणण्यासाठी गेलेत की पक्ष फोडायला? असे ते म्हणाले. तसेच ते आमदार खासदार कधी फुटतात मी याचीच वाट पाहतोय, असेही पवार म्हणाले. त्यानंतर पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला.