मुंबई | Mumbai
महाष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर, 31 जानेवारी रोजी म्हणजे अजित पवारांच्या निधनानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चेने दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रिकरणाची प्रक्रिया सुरूच झाली नव्हती, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दादा गटातील नेत्यांनी केला. त्यांच्या या आरोपांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिले.
जे आमच्या बैठकीत चर्चेलाही नव्हते त्यांना आमच्यात…
दोन्ही पक्षाकडून होणारे दावे आणि प्रतिदाव्यामुळे संभ्रामाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार असते तर अजित पवार यांनी मला सांगितले असते. ते माझ्याशी सर्व गोष्टी शेअर करायचे असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला. यावर आता शरद पवार यांनी पत्रकारांसोबत केलेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान ठोस भूमिका मांडली आहे. शरद पवार म्हणाले, जे आमच्या बैठकीत चर्चेलाच नव्हते, त्यांना आमच्यात काय चर्चा झाली, याची कशी माहिती असेल? असा सवाल पवार यांनी केला. एकप्रकारे शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि दादा गटातील नेत्यांचे दावे खोडून काढले.
शरद पवार यांनी मुंबईत सोमवारी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. या चर्चेत राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणावर आतापर्यंत काय काय चर्चा झाली होती, त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू झाली होती का? असे प्रश्न पत्रकारांनी शरद पवार यांना विचारले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विलीनीकरणावरील दावाही पवार यांच्यासमोर ठेवला. तेव्हा त्यांनी दादा गटातील नेत्यांना आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही बोचरा वार केला. याउलट राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाबाबत आमच्यात चर्चा झाली होती. आमच्या बैठकाही झाल्या होत्या. १२ फेब्रुवारीला आम्ही त्यासंदर्भात घोषणा करणार होतो, असे शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
शरद पवारांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की, दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये एकत्रिकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात गेली असती, तर अजित पवारांनी आम्हाला सांगितले असते. अजित पवारांचा पक्ष आमच्या सरकारमध्ये आहे. त्यामुळे आमच्याशी चर्चा न करता ते विलीनीकरणाचा निर्णय घेऊ शकतील का? तसेच विलीनीकरणाची तारीख ठरली असती, तर अजित पवारांनी आम्हाला सांगितले असते. आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यात काय बोलणे झाले, याची आम्हाला कल्पना नाही. मी आमच्यापुरते सांगतो की, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या तारखेची कल्पना आम्हाला नाही, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.





