Saturday, August 22, 2026
HomeराजकीयSharad Pawar : राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा; शरद पवारांनी अखेर सस्पेन्स संपवला, म्हणाले...

Sharad Pawar : राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा; शरद पवारांनी अखेर सस्पेन्स संपवला, म्हणाले…

मुंबई । Mumbai

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या काही दिवसांपासून उठलेले वादळ आणि रोज नव्याने शिजणाऱ्या राजकीय गणितांना अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजिबात एनडीएसोबत (NDA) जाणार नाही, तसेच दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीकरणाच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही,” असे रोखठोक विधान करत शरद पवार यांनी सर्व राजकीय पतंगबाजी फेटाळून लावली आहे.

- Advertisement -

गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. पाठोपाठ खासदार सुप्रिया सुळे यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. शरद पवारांचा पक्ष केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी आघाडीत सहभागी होणार, केंद्रात एक आणि महाराष्ट्रात दोन मंत्रिपदे शरद पवारांच्या पक्षाला मिळणार, अशा जोरदार चर्चा राजकीय गल्लीबोळात सुरू झाल्या होत्या. त्यातच दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे विलीनीकरण झाल्याशिवाय एनडीएमध्ये प्रवेश मिळणार नाही, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या हवाल्याने पसरवले जात होते.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी शरद पवार यांना थेट सवाल केला असता, त्यांनी सर्व शक्यता फेटाळून लावल्या. पवार म्हणाले, “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या किंवा विलीनीकरणाच्या अजिबात चर्चा सुरू नाहीत. एनडीएसोबत जाण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. या सर्व चर्चा केवळ अफवा आहेत.” पवारांच्या या थेट स्पष्टीकरणामुळे तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या दिल्लीतील भेटीगाठींमुळे महायुतीतील इतर घटक पक्षांमध्ये, विशेषतः अजित पवार गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठी अस्वस्थता पसरली होती. जर शरद पवार एनडीएमध्ये आले, तर आपले राजकीय महत्त्व कमी होईल या भीतीपोटी एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांनी तातडीने अमित शाह यांची भेट घेतली होती.

दरम्यान, शरद पवारांच्या या स्पष्टीकरणानंतर महायुतीतील नेत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय वारे नक्की कोणत्या दिशेने वाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

लिपिक आणि लघुलेखक पदाची फेरपरीक्षा घ्या – जयंत पाटील यांचे उच्च...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत लिपिक आणि लघुलेखक पदांच्या भरती प्रक्रियेदरम्यान १६ ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या टायपिंग टेस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी...