Sunday, November 22, 2026
HomeनगरRahata : केलवडमध्ये एकाच रात्री तीन ठिकाणी धाडसी चोर्‍या

Rahata : केलवडमध्ये एकाच रात्री तीन ठिकाणी धाडसी चोर्‍या

लाखोंचा मुद्देमाल लंपास

राहाता |वार्ताहर| Rahata

तालुक्यातील केलवड गावात एकाच रात्रीत चोरट्यांनी तीन ठिकाणी धाडसी चोर्‍या करत मोठा धुमाकूळ घातला आहे. बंद घरे आणि दुकाने लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी लाखोंचा मुद्देमाल लंपास केल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रकाश दत्तात्रय जोशी यांच्या श्री स्वामी समर्थ जनरल स्टोअर्सचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील लाखो रुपयांचा ऐवज लांबवला, तसेच घरातील कपाटांची व कपड्यांची उचकापाचक करत किमती वस्तू शोधण्याचा प्रयत्न केला. यानंतर चोरट्यांनी आप्पासाहेब सोनवणे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आतून रोख रक्कम लांबवली.

- Advertisement -

एवढ्यावरच न थांबता, गावातील सुवर्णकार मनोज चंद्रकांत उदावंत यांचे गुरुदत्त अलंकार हे सोन्या-चांदीचे दुकान फोडून मोठे नुकसान केले. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याची माहिती मिळताच राहाता पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक संगीता गिरी व काकड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सध्या पोलिसांकडून पंचनामा केला जात असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे चोरीच्या घटना वाढल्याने ग्रामस्थ व व्यापार्‍यांनी रात्री विशेष दक्षता बाळगावी आणि संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केलवडचे पोलीस पाटील सुरेश गमे यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik : शिवतीर्थावर दीपोत्सवाचा लखलखाट; ‘महाकुंभ’ नावाची भव्य दीपमांडणी

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik हजारो पणत्यांच्या लखलखाटात 'महाकुंभ’’ नावाची भव्य दीपमांडणी, पारंपरिक गोदा आरती, फटाक्यांची आतषबाजी आणि लोकसंगीताच्या सुरांनी शिवतीर्थ परिसर रविवारी (दि. २२) उजळून...