महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतरही हे सरकार पडद्यामागून शरद पवारच चालवत आहेत, अशी एक चर्चा होती. विराेधकांकडून संदिग्ध वक्तव्ये करून यास हवा दिली जात होती. अखेरी ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी पवारांना विचारलेल्या प्रश्नातून त्याचे उत्तर मिळाले. महाविकास आघाडी सरकारचे आपण हेडमास्तर आहात की रिमोट कंट्रोल असे त्यांना विचारण्यात आले. त्यावर मी यापैकी दोन्हीही नाही, असे स्पष्ट उत्तर शरद पवार यांनी उदाहरणासह दिले. आतापर्यंत सामनात केवळ बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांची ‘मॅरेथाॅन’ मुलाखती प्रसिद्ध झाल्या हाेत्या. आता प्रथमच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची मुलाखत आली. राऊत यांच्या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘मी राज्यातील सरकारचा हेडमास्तर असण्याचे काही कारण नाही. त्यासाठी आधी सरकारमध्ये असले पाहिजे. मी सरकारमध्येच नाही. रिमोट कंट्रोलने सरकार किंवा राज्य चालत नाही. लोकशाहीमध्ये तर नाहीच नाही,’ असे पवार यांनी ठामपणे सांगितले.
…तर महाराष्ट्राचा न्यूयार्क झाला असता
करोनाचा प्रादुर्भाव होत असतानाच सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रामध्ये लॉकडाउनचे निर्बंध कठोर करण्याची आवश्यता होती. महाराष्ट्रात कठाेर निर्णय घेतला नसता तर न्यूयॉर्कसारखी परिस्थिती निर्माण झाली असती. आपण न्यूयाॅर्क शहरांमधील बातम्या वाचतोच. तिथे मोठ्या प्रमाणात लोकांचे मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रात कठाेर पद्धतीने लॉकडाउन राबवले आणि लोकांनी सहकार्य केले म्हणून ही परिस्थिती सुधारण्यास मदत झाली. पहिले दोन महिने अडीच महिने याची आवश्यकता होती आणि तो मुख्यमंत्र्यांचा, राज्य सरकारचा दृष्टीकोन १०० टक्के बरोबर होता. आमच्या सगळ्यांचा याला मनापासून पाठिंबा आहे. लॉकडाउनवरुन तुमची आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी आहे का? त्यावर ते म्हणाले, राज्य सरकारच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या सर्व निर्णयांना आपला पाठिंबा होता
आता कराेनासाेबत जगायची तयारी ठेवा
एक गोष्ट तर या काळात स्पष्ट झालेली आहे की, इथून पुढे तुम्हाला, मला, आपणा सर्वांना कोरोनासोबत जगायची तयारी ठेवली पाहिजे. कोरोना आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग होत आहे, अशा प्रकारची भूमिका तज्ञांकडून मांडली गेली आहे. त्यामुळे आता आपणही हे स्वीकारायला पाहिजे. ही परिस्थिती गृहीत धरूनच पुढे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे.
अर्थचक्र पुन्हा सुरु करावे
पवार यांनी राज्यातील अर्थचक्र पुन्हा सुरु करण्याची गरज असल्याचेही मत मांडले. एखाद्या राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्धवस्त झाल्यास करोनापेक्षा त्याचे दृष्परिणाम अधिक भयंकर असतील. देशाची समाजाची आणि राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाल्यास करोनापेक्षा त्याचे दृष्परिणाम पुढील काही पिढ्यांना सहन करावे लागतील. अर्थव्यवस्था पुन्हा सवरता कशी येईल यासंदर्भात काळजी घेऊन निर्णय घेणे आणि तेवढ्यापुरती मोकळीक देणे गरजेच आहे. याचा अर्थ सगळे खुले करा असा नाही. मात्र थोडी तरी मोकळीक आता हळूहळू द्यायला हवी.
बाळासाहेबांची विचारधारा भाजपशी सुसंगत नव्हती
बाळासाहेबांची भूमिका आणि भाजपची विचारधारा यात फरक हाेता. विशेषतः कामाच्या पद्धतीत बराच फरक आहे. बाळासाहेबांनी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, प्रमोद महाजन अशा काही व्यक्तींचा सन्मान केला. या सर्वांना त्यांनी सन्मानाने वागणूक देऊन त्यातून एकत्र येण्याचा विचार केला आणि पुढे सत्ता येण्यात हातभार लावला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सबंध विचारधारा, कामाची पद्धत ही भारतीय जनता पक्षाच्या विचाराशी सुसंगत नव्हती, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.