मुंबई । Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची त्यांच्याच ऑफिससमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वांद्रे येथील निर्मलनगर येथे शनिवारी रात्री त्यांच्यावर तीन आरोपींकडून सहा राऊंड फायर करण्यात आले. यात त्यांचा मृत्यू झाला. हे तिघे आरोपी रिक्षातून आले आणि त्यांनी थेट सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या.
पोलिसांनी या तीनपैकी दोन आरोपींना अटक केली आहे. तर, तिसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे. तसेच, ज्या आरोपींना पोलिसांनी अटक केली त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्ट समोर आल्या आहेत. या प्रकरणावरून आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या घटनेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी खेद व्यक्त केला असून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे.
काय म्हणाले शरद पवार ?
राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या प्रकरणावरून सरकारवर टीका केली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था किती ढासळली आहे, हे दाखवणारी ही परिस्थिती आहे. सुळे यांनी देखील यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
मुंबईतील माजी आमदार व मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची बातमी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. त्यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्याला भररस्त्यात गोळी झाडून मारण्यात आले. पुणे असो किंवा मुंबई राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा दाखविणारी ही आणखी एक घटना. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगी माझ्या संवेदना त्यांचे पुत्र झीशान यांच्यासोबत आहेत. त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.