श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
एका मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीने शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून श्रीगोंदा, पारनेर, नगरच्या गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. दरम्यान, गुंतवणूकदारांनी पैसे परत घेण्यासाठी तगादा सुरू केला आहे मात्र, कंपनीकडून संदिग्ध माहिती देण्यात येत असून केवळ बनवाबनवी सुरु असल्याने गुंतवणूकदार हैराण झाले आहेत.
मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीने पैसे परत मागणार्या गुंतवणूकदारांना सुरुवातीला पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर एका दुसर्याच कंपंनीत परस्पर पैसे वळवल्याची माहिती देण्यात आली आणि आता पुन्हा कंपनीकडून गुंतवणूकदांराचे पैसे ग्लोबल ट्रेडिंगसाठी नव्याने केलेल्या कंपनीत वर्ग करण्यात येत असल्याचे सांगत वेळ मारून नेण्यात येत आहे. त्यामुळे धास्तावलेले गुंतवणूकदार आक्रमक झाले असून लवकरच कंपनीविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे समजते.
एका मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीने सुरुवातीला गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले असल्याचे सांगत ठेवीवर महिन्याला 10 ते 12 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले. महिन्याला लाख रुपयांना दहा ते बारा हजार परतावा देवून विश्वास संपादन केला. त्यामुळे कंपनीत गुंतवणूकदारांची रीघ लागली. कुणी पदरचे पैसे गुंतवले, कुणी जास्त परतावा मिळतो म्हणून कर्ज काढले, जमिनी,जागा विकून पैशांची गुंतवणूक केली. वेळप्रसंगी सावकार, बँकेकडूनकडून कर्ज काढून कंपनीमध्ये पैसे गुंतवले. अनेकांनी कोट्यवधी रुपयांच्या ठेवी कंपनीकडे जमा केल्या त्यासाठी एजंट आणि व्यवसाय भागीदारांना भरघोस कमिशन देण्यात आले. आता, गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार मागणी करुनही कंपनीकडून गुंतवणूकदारांना पैसे मिळत नसून दिशाभूल केली जात आहे.
ग्लोबल ट्रेडिंगचे नवे गाजर
दरम्यान, कंपनीकडून आता ग्लोबल ट्रेडिंगचे नवीन गाजर दाखविण्यात येत आहे. गावोगावात कंपनीचे एबीपी म्हणजे अधिकृत भागीदार असलेले एजंट बैठक घेऊन आपली कंपनी भारतीय शेअर बाजारऐवजी जागतिक शेअर बाजारात पैसे गुंतवणूक केली जाणार असल्याचे सांगत आहेत. ग्लोबल ट्रेडिंगच्या नावाखाली नवीन गाजर दाखवून गुंतवणूकदारांची मुद्दल आणि व्याज परतावा न देता वेळ मारून नेली जात आहेत. दरम्यान, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवश्यक डिमॅट आणि ट्रेडिंग खातेच कंपनीने उघडले नसल्याचे समोर आले आहे. गुंतवणूकदारांच्या अज्ञानाचा फायदा घेत कंपनीने त्यांची फसवणूक केली आहे.




