शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav
जादा परताव्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटच्या नावाखाली अनेकांना तब्बल 33 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घालणार्या संशयित आरोपींना शेवगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच सापळा लावून जेरबंद केले. अवधूत विनायक केदार (वय 46, रा. साईकृपा नगर, आखेगाव रोड, ता.शेवगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सखाराम नामदेव ढोरकुले (वय 27. रा. बाबुळगाव, ता.शेवगाव), फ्रान्सिस सुधाकर मगर (वय 50, रा.आखेगाव रोड, शेवगाव) या संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुरुकृपा ट्रेडिंग इनव्हेस्ट शेअर मार्केट ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देतो, असा विश्वास संपादन केल्यानंतर साक्षीदारासमोर ढोरकुले व मगर यांच्याकडे 33 लाख 50 हजार रुपयांची रक्कम दिली. रक्कम व परतावा मिळावा यासाठी वेळोवेळी त्यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र त्यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
15 डिसेंबरला गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी सखाराम ढोरकुले व फ्रान्सिस मगर हे पळून जाण्याच्या तयारीत होते. पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस पथके तयार करुन तपासाची चक्रे वेगाने फिरवली. एका पथकाने ढोरकुले यास पैठण रस्त्याने जात असताना पाठलाग करुन तर दुसर्या पथकाने मगर यास शहरातील आखेगाव रस्त्यावर ताब्यात घेतले. अहिल्यानगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात आरोपीस हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना केले होते. पथकाने सखाराम ढोरकुलेला पळून जात असताना मोटारसायकलवर पाठलाग करून पैठण रोड (शेवगाव) येथे पकडले तर फ्रान्सिस मगरला आखेगाव रोड (शेवगाव) येथून ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण महाले, पोहेकॉ चंद्रकांत कुसारे, पोकाँ शाम गुंजाळ, संतोष वाघ, राहुल खेडकर, फलके, धनेश्वर पालवे, प्रशांत आंधळे, देविदास तांदळे, पोकाँ राहुल गुंडु यांनी केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण महाले करीत आहेत.