शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav
जादा परताव्याचे आमिष दाखवून शेअर मार्केटच्या नावाखाली अनेकांना तब्बल 25 लाख 64 हजार रुपयांचा गंडा घालणार्या संशयित आरोपीला शेवगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच सापळा लावून जेरबंद केले. संभाजी भिमराज गाडेकर (वय 32, रा.माळेगाव ने, ता.शेवगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव तालुक्यातील रावतळे कुरुडगाव येथील एके शेअर मार्केटिंग ट्रेडिंग कंपनीचा शिवाजी रावसाहेब बोरकर (रा.थेरगाव, ता. पैठण) या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर अन्य दोन संशयित आरोपी पसार झाले आहेत. शेवगाव तालुक्यात भरमसाठ परताव्याचे अमिष दाखवून लुबाडण्याचे सत्र शेअर मार्केटच्या माध्यमातून सुरू आहे. फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत.
माळेगाव ने येथील संभाजी गाडेकर यांचा विश्वास संपादन करून एके कंपनीच्या तिघांनी शेअर मार्केटमध्ये जास्त नफ्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडून 25 लाख 64 हजार रुपयांची रक्कम घेतली. त्यांना मूळ रक्कम व अधिकचा नफा देण्यास टाळाटाळ केली. 3 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी शिवाजी बोरकर पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस पथक तयार करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पथकाने पैठण परिसरात मंगळवारी (दि.4) पहाटे दोनच्या सुमारास पाचोड संभाजीनगर रस्त्यावर उसाच्या शेतात लपलेला संशयित आरोपी बोरकर यास ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे, पोलीस नाईक आदिनाथ वामन, पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ, संतोष वाघ, राहुल खेडकर, प्रशांत आंधळे, संपत खेडकर, सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांच्या पथकाने केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुंदरङे करीत आहेत.