श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून श्रीगोंदा, पारनेर, नगरसह राज्याच्या अनेक भागात एका मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदारांची कोटयवधींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीकडून गुंतवणूकदारांना पैसे परत मिळत नसल्याने ते कंगाल झाले आहेत.दुसरीकडे गुंतवणूकदारांच्याच पैशातून कंपनीकडून मिळालेल्या कमिशनमुळे एजंट मालामाल झाले आहेत. त्यांनी अलिशान गाड्या, बंगले, जमिनी, प्लॉटमध्ये आपल्या आणि कुटुंबाच्या नावाने कमिशनच्या पैशांची गुंतवणूक केली आहे. जास्त पैसे गुंतवणूक करणार्यांना कंपनीने दुबई, गोव्याची सहल घडवली. एजंट, व्यवसाय भागीदारांना भरघोस कमिशनसह देश-विदेशात सहलीला नेऊन आणले. गुंतवणूकदारांना केवळ श्रीमंत होण्याचे स्वप्नच दाखविले.
एका मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीने सुरुवातीला गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले असल्याचे सांगत ठेवीवर महिन्याला 10 ते 12 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले. महिन्याला लाख रुपयांना दहा ते बारा हजार परतावा देवून विश्वास संपादन केला. त्यामुळे कंपनीत गुंतवणूकदारांची रीघ लागली. कुणी पदरचे पैसे गुंतवले, कुणी जास्त परतावा मिळतो म्हणून कर्ज काढले, जमिनी,जागा विकून पैशांची गुंतवणूक केली. वेळप्रसंगी सावकार, बँकेकडून कर्ज काढून कंपनीमध्ये पैसे गुंतवले. अनेकांनी कोट्यवधी रुपयांच्या ठेवी कंपनीकडे जमा केल्या त्यासाठी एजंट आणि व्यवसाय भागीदारांना भरघोस कमिशन देण्यात आले.
आता, गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार मागणी करुनही कंपनीकडून गुंतवणूकदारांना पैसे मिळत नसल्याने अनेकजण धास्तावले आहेत. मल्टिपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीकडून एका दुसर्याच कंपनीकडून तुमचे पैसे परत दिले जातील, असे सांगून मारुन नेण्यात येत आहे. मुद्दल परत मिळत नसल्याने फसवणूक झालेले ठेवीदार हवालदिल झाले आहेत.