Wednesday, November 6, 2024
Homeब्लॉग३० सप्टेंबर १९९३

३० सप्टेंबर १९९३

गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीत बडवल्या जाणाऱ्या ढोलांचा आवाज क्षीण होत गेला. रात्रीच्या विशाल काळ्याभोर पडद्याआड सारं जग निर्धास्तपणे झोपी गेलं. दूरवर कुत्र्यांच्या विव्हळण्याचा आवाज त्या गडद काळोखात अलगदपणे विरघळून गेला. रस्त्यावरच्या दिव्यांखालचा वर्तुळाकार मलूल उजेड मरून पडल्यासारखा दिसू लागला. शांततेच्या अनाहत नादाने अवघं चराचर गंभीर झालं. काय होतं त्याच्या गर्भाशयात? ही कुठल्या अरिष्टाची चाहूल तर नव्हती?

भिंतीला टेकवलेली पत्र्याची फोल्डिंगची खुर्ची पायाकडून घरंगळत जमीनीवर धाडकन आदळली. मोठ्ठा आवाज झाला. दचकून जाग आली. दिवे गेलेले. सभोवार अंधार. जमीन हादरत होती. बाहेर कुत्र्यांचा विचित्र भुंकण्याचा, विव्हळण्याचा आवाज काळजाला चिरून टाकीत होता. अवेळीच पक्षी जागे होऊन सैरावैरा झाल्याने त्यांच्या पंखांची फडफड स्पष्टपणे ऐकू येत होती. काळोखात डोळे सरावले आणि परिस्थितीची जाणीव झाली. भूकंपाच्या हादऱ्यांनी सभोवताल हेलकावत होता. दरवाजा उघडून रस्त्यावर धावलो. आकाशात लुकलुकणाऱ्या फिकट करड्या प्रकाशात जग भेसूर आणि अधिकच उदासवाणं दिसत होतं. त्या तीनचार मिनिटांत जे घडलं त्याने जीवाचा थरकाप उडाला होता. भीतीने गर्भगळीत झालेले लोक आपापसात हलक्या आवाजात कुजबुजत होते. कुठलाच अंदाज येत नव्हता. तोवर मोबाईल आलेले नव्हते. संदेशवहनाची आजच्यासारखी दणकट व्यवस्था त्यावेळी अस्तित्वात नव्हती. उरलेली रात्र सगळ्यांनी रस्त्यावरच जागून काढली. पूर्वेचा काळीमा फिकट होत गेला. ३० सप्टेंबर १९९३ ची पहाट उगवतीच्या क्षितिजावर फटफटत होती.

- Advertisement -

सकाळी आकाशवाणी, दूरदर्शनवर जे ऐकलं, पाहिलं त्याने सुन्न झालो. किल्लारी, औसा परिसरात केंद्रबिंदू असणाऱ्या भूकंपाने त्या परिसराला जबरदस्त तडाखा दिला होता. दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली हजारो जीव गाडले गेले होते. त्यातून जे जगले वाचले त्यांच्या आकांताने जग हादरत होतं. भूकंपाने कोलमडून पडलेल्या व्यवस्थेला उभं करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झालं. जात, धर्म, पंथांच्या भिंती धडाधड भूईसपाट झाल्या. माणूस माणसासाठी माणूसकीचा दूत बनून धावू लागला. जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. भाषा वेगळी, संस्कृती वेगळी, विचार वेगळे परंतु माणूसकीच्या अस्तराने हे सगळं फाटलेलं एकसंध केलं. लोक उपसत होते ढिगारे. शोधत होते अस्तित्वाच्या खुणा. उत्खननात सापडत होती मरून गेलेली आई, मरून गेलेला बाप. मरून गेलेले काळजाचे तुकडे इथेतिथे विखुरलेले. सांदीकोपऱ्यात आडोसा मिळाल्याने ढिगाऱ्याखाली सापडलेल्या इवल्याशा जीवांची धडधडणारी हृदयं पाहून ढिगारे केवळ मातीचे ढिगारे राहत नव्हते तर त्यांना आईच्या गर्भाची उपमा प्राप्त होत होती. जो नियंता ही रचना उभी करतो तोच ती भूईसपाटही करतो. तोच घडवतो आणि फोडूनही टाकतो. घडवणे आणि फोडून टाकणे या दरम्यानचा जो अवकाश असतो त्याला आपण ‘आयुष्य’ नावाची संज्ञा बहाल करतो आणि खेळत राहतो जीवनाचा अनाकलनीय खेळ.

किल्लारीला भूकंपग्रस्तांना मदत पाठवायची होती. संस्था पातळीवर काय करता येईल याची जुळणी चालू होती. त्या दरम्यान वेगवेगळ्या वर्तमानपत्रांतून जे छापून आलं ते विदारक सत्य व्यवस्थित डकवून खाली त्याला यथार्थ गद्यमय, पद्यमय ओळी टाकून मांडलं लोकांसमोर प्रदर्शन म्हणून. जे होतं ते सगळं असं अंगावर येणारं, शहारे आणणारं, आतील करूणेचे झरे प्रवाहीत करणारं, दातृत्वाची कनवटी खुली करणारं. परंतु तरीही काहीशी अस्वस्थता शिल्लक होतीच तळाशी. ती सारख्या धडका देत होती मनाशी. त्यामुळे बेचैनी अधिकच वाढत होती. मायेचं, छायेचं छत्र हरवलेल्या लेकरांचे चेहरे तरळत होते डोळ्यांसमोर. मातीखाली गाडल्या गेलेल्या लहानग्यासाठी वेडीपिशी झालेली माय, तिचा व्याकुळ हंबर धारदार खंजर बनून कापीत होता काळजाला आरपार. भूकंपाचं भयकारी रूप आणि नियतीचं अगम्य अप्रूप एकाचवेळी घोळत होतं डोक्यात. रात्री बराच वेळ झोप यायची नाही. अशाच एका अस्वस्थ रात्री लिहून झाली ‘३० सप्टेंबर १९९३’ ही कविता.

शीर्षक तेच ठेवून वाङ़मयीन गुणवत्तेचा मानबिंदू असणाऱ्या ‘मौज’ दिवाळी अंकासाठी कविता धाडून दिली. कविता वाचून तत्कालीन संपादक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचं पानभर पत्र आलं. त्यात काही दुरूस्ती, सूचनांचा समावेश होता. त्या दरम्यान संजय कळमकर, हेरंब कुलकर्णी माझ्याकडे पाथर्डी मुक्कामी होते. त्यांनीही ते पत्र वाचलं. एका कवितेचा छापत असताना किती बारकाईने विचार होतो आणि तिचं वाङ़मयीन मूल्यमापन या असाधारण गोष्टींचं त्यांना विशेष आश्चर्य वाटलं. संजय कळमकरांनी त्यांच्या एका लेखात या वाङ़मयीन व्यवहाराचा कवितेच्या निमित्ताने यथोचित गौरवपूर्ण उल्लेख केला. एकोणीसशे शहाण्णवच्या दिवाळी अंकात कविता छापून आली. लगोलग बेळगावहून ऋषीतुल्य असणारे कविवर्य शंकर रामाणी यांचं कविता आवडल्याचं दोन ओळींचं पत्र आलं. त्या दोन ओळींनी माझ्या कवितेचं आकाश सर्वव्यापी झालं. एकोणीसशे नव्याण्णव साली तैवानला आलेल्या भूकंपानंतर कविवर्यांचं पुन्हा एक पत्र आलं. ते असं होतं.

सप्रेम नमस्कार

तीन ऑक्टोबर ९९ च्या मिलिंद चितळे यांनी तैवानला आलेल्या भीषण भूकंपाचा प्रत्यक्षानुभव घेऊन केलेले सत्यकथन वाचले – ‘थरार यात्रा’ असे त्या लेखाचे शीर्षक आहे. खरोखरच थरारून टाकणारा; अंगावर शहारे आणणारा तो अनुभव आहे. त्याच संदर्भात १९९६ च्या ‘मौज’ दिवाळी अंकात आलेली आपली उत्कृष्ट कविता ‘३० सप्टेंबर १९९३’ वाचली. पण आपल्या कवितेतला ‘काव्यरूप’ घेतलेला अनुभव अतिशय उत्कट, काळीज चिरून जाणारा आहे. ती कविता मी पुन्हा नुकतीच वाचली.

मराठी व इतर भाषेतील मला अवगत असलेल्या (पोर्तुगीज, इंग्लीश व कोकणी) अत्युत्कृष्ट वाटलेल्या कविता मला अजून आठवतात व पुन्हा वाचल्यानंतर मन हेलावून जातात. पण हे क्वचित घडते. आपली ‘३० सप्टेंबर १९९३’ ही कविता त्यांपैकीच एक हे मी पुन्हा स्वच्छ मनाने प्रामाणिकपणे लिहीत आहे.

आपला

शंकर रामाणी.

‘दिवे लागले रे दिवे लागले. तमाच्या तळाशी दिवे लागले’ अशी उजेडाची ओळ लिहिणारा हा अवलिया कवी काही वर्षांनी माझी कविता घेऊन अनंताच्या प्रवासाला निघून गेला. आजही जगात कुठे भूकंप येऊन गेल्याचं वाचलं की मला श्रीनिवास विनायक कुलकर्णी आठवतात. कविवर्य शंकर रामाणींची आठवण काळजाच्या तळातून वर येते. कपाटात जपून ठेवलेली त्यांची पत्रं साक्ष ठेवून मी ‘मौज’चा दिवाळी अंक उघडतो. ‘३० सप्टेंबर १९९३’ या कवितेची अक्षरे नजरेसमोरच्या धुक्यात विरघळून जातात.

३० सप्टेंबर १९९३

जमीन हादरली आणि पहाटेच्या स्वप्नांना गेले इथून तिथून तडे

ज्याने घडवले त्यानेच फोडून टाकले एका क्षणार्धात सारेच घडे.

जे जगले वाचले बिचारे त्यांच्या आकांताचं इथवर वाहत आलय पाणी

या पाण्याला नाही जात, नाही धर्म केवळ माणूसकीची वाणी.

उपसले जाताहेत ढिगारे तशा धडधडताहेत सामुहिक चिता

कुराणाचे ओले डोळे पुशीत असते एका कोपऱ्यात भगवद़्गिता.

तीन दिवसांनंतरही एखाद्या ढिगाऱ्याखाली जेव्हा जीवंत असतो चिमुकला प्राण

ढिगाऱ्याला ढिगारा म्हणवत नाही त्याला आपसूकच मिळतो आईच्या गर्भाचा मान.

मदतीचे हजारो हात जेव्हा धावून येतात ओळखी अनोळखीच्या प्रदेशातून

तेव्हा माणूसकीच डोकावत असते सभोवती विणलेला कठोरतेचा बुरखा फाडून.

घडवणे आणि फोडून टाकणे या दरम्यानच्या प्रवासाला असतं आयुष्य हे गोंडस नाव

एक धक्का पुरेसा असतो पुसून टाकायला घरदार, शेतीवाडी, सारं गाव.

-शशिकांत शिंदे

(९८६०९०९१७९)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या