नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
गेल्या काही दिवसांपासून शिमल्यामध्ये एका मशिदीवरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिमल्यातील संजौली भागातल्या एका मशिदीवर काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला असून तिथले अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणावरुन हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. हिंदू संघटना बेकायदा बांधकाम पाडण्याची मागणी करत आहेत. यावरून आता मोठा तणाव निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिमला पोलिसांनी संजौली परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. ११ वाजता आंदोलनाची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी संजौलीतील काही दुकाने व इतर लोकांना हटवले. यादरम्यान, हिंदू नेते कमल गौतम संजौली चौकात पोहोचले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना त्यांच्या समर्थकांसह ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी ढली बाजूचे दोन्ही बोगदे बंद केल्यावर आंदोलकांनी ढली भाजी मंडईत रस्त्यावर बसून आंदोलन सुरू करत हनुमान चालीसाचे पठनही केले. यानंतर आंदोलक येथून पुढे सरसावले आणि नंतर बॅरिकेड्स तोडले. यादरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि वॉटर कॅननचा वापर केला.
जमाव नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही मागवण्यात आला आहे. सुरुवातील जवळपास १००० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र आंदोलकांना रोखण्यात पोलिसांना अपयश आले.
तर दुसरीकडे, कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह म्हणाले, “सर्वांना शांततामय मार्गाने विरोध करण्याचा अधिकार आहे. सरकारने सुद्धा हेच म्हटलय” “शांतता भंग होईल, अशी स्थिती निर्माण होऊ नये. म्हणून खबरदारीच्या हेतूने पोलिसांनी पावले उचलली आहेत. कलम १६३ लागू करण्यात आलय” असे विक्रमादित्य सिंह म्हणाले. “हे प्रकरण न्यायालयात विचाराधीन आहे. सुनावणीनंतर सरकार निर्णय घेईल. ही मशिद बेकायद असेल, तर निश्चित कारवाई केली जाईल. नगर आयुक्तांच्या आदेशानंतर हे पाऊल उचलण्यात येईल. त्याआधी कारवाई करणे योग्य नाही” असे विक्रमादित्य सिंह म्हणाले.
नेमके प्रकरण काय आहे?
संजौली भागातल्या एका मशिदीमध्ये बेकायदेशीर बांधकाम करण्यात आल्याचा दावा काही हिंदू संघटनांनी केला होता. त्यावरून तीव्र भावना व्यक्त होऊ लागल्या होत्या. हे बांधकाम पाडण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात होती. आपल्या मागण्यांसाठी शिमला विधानसभेच्या जवळच असणाऱ्या चौरा मैदानात हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नव्हती, असे सांगितले जात आहे.
परवानगी नसताना मोर्चा निघाल्यामुळे पोलिसांनी आज सकाळी आधी आंदोलकांना माघार घेण्याचे आवाहन केले. त्यानंतरही आंदोलक आक्रमक झाल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. तसेच, पाण्याचा तीव्र मारा आंदोलकांवर करण्यात आला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा