सोनई (वार्ताहर)
शिंगणापूर बनावट अॅपबाबत सोशल मीडियात चर्चा झाली. सामान्य जनतेत संतप्त प्रतिक्रिया आल्या, सायबरकडे देवस्थानाने तक्रार अर्ज दिला, विविध पक्षाच्या नेत्यांनी सुद्धा अर्ज दिले तरीही या प्रकरणात गुन्हे दाखल होणे तर सोडच पण साधी चौकशी सुद्धा होत नाही. याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.
गेल्या एक महिन्यापासून या प्रकरणाची चर्चा होत आहे. नगर धर्मादाय आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रारी दाखल केल्या असल्याने नगर सायबर शाखा व धर्मादाय कार्यालय चौकशी करत आहे. सोशल मीडियात याबाबत साधक बाधक चर्चा होत आहे. गेल्या एक महिन्यापूर्वी हे प्रकरण उजेडात आले परंतु आजपर्यंत कुणावरही कारवाई झाली नाही. नुकतेच मुस्लिम कर्मचारी कमी करण्यात यावे यासाठी हिंदुत्वादी संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा देताच देवस्थानाने १६७कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले त्यात ११४ मुस्लिम कर्मचारी यांचा समावेश होता. यावरून भूमाता ब्रीगेडच्या संस्थापक अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देवस्थानच्या भूमिकेला विरोध केला.
विश्वस्त मंडळाची मुदत डिसेंबर २५ मध्ये संपत आहे. नेहमीप्रमाणे विश्वस्त मंडळ चर्चेत आले आहे. शनी शिंगणापूर देवस्थानवर नेहमी राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतात. विश्वस्त मंडळात वर्णी लागावी यासाठी अनेक ग्रामस्थ प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. नवीन विश्वस्त मंडळ आता राज्यातून होणार असल्याची चर्चा आहे यापूर्वी फक्त शनी शिंगणापूरचा रहिवासी असणारा माणूसच विश्वस्त होत होता.
बनावट अॅपचा मास्टर माईंड कोण ?
काही अॅपला शिंगणापूर देवस्थानने आग्रिमेंट करून परवानगी दिली तरीही यात घोटाळा झाला असा आरोप होत आहे परंतु गेली ३ वर्ष खुलेआम बोगस अॅप कुणी चालविले? करोडो रुपये कुणाच्या खात्यात आले ? देवस्थानने अगीदरच कारवाई का नाही केली ? असे अनेक प्रश्न उपास्थित होत आहे. हा सगळा प्रकार दररोज मंदिरात सर्वांच्या समोर खुलेआमपणे होत होता. देवस्थान मधिल अधिकारी, कर्मचारी, गावकरी यांना सर्व नावे माहित असल्याची चर्चा असून कुणीही जाहिरपणे नाव का घेत नाही.
विद्यमान आमदार गप्प का?
शिंगणापूर अॅपबाबत राज्यात नाही तर देशात चर्चा होत असताना जे तालुक्याचे प्रथम नागरिक आहे जे सत्तेत आहे. ज्यांच्या एक फोनवर एका दिवसात चौकशी लागू शकते त्यांनी आजपर्यंत फक्त एका शब्दाची प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात विद्यमान यांनी ठोस कारवाई का केली नाही, ते शांत का आहे याची चर्चा तालुक्यात होत आहे. याउलट भाजप, शिवसेना, काँग्रेसचे युवक पदाधिकारी सातत्याने दोषींवर करवाई करण्याची मागणी करत आहे.




