सोनई |वार्ताहर| Sonai
जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी श्री शनैश्वर देवस्थानचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी 11 जणांच्या कार्यकारी समितीची स्थापना केली असून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री शनैश्वर देवस्थान मध्ये अवैध नोकर भरती, बनावट अॅप, आर्थिक व्यवहार यासह अनेक गंभीर बाबीमुळे देवस्थानची चौकशी सुरू आहे.
श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था (शिंगणापूर) अधिनियम 2018 मधील कलम पाचच्या उपकलम एक अन्वये श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्थापन समिती या नावाने संबोधले जाणारे समिती गठीत होईपर्यंत सदर देवस्थान विश्वस्तव्यवस्थेचा कारभार सुरळीत चालविला जावा तसेच देवस्थानच्या दैनंदिन व्यवहाराचे व्यवस्थापन विनाविग्न पार पाडले जावे, याकरिता राज्य शासनाने 22 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांची श्री शनैश्वर देवस्थान येथे प्रशासक म्हणून तात्पुरती नियुक्ती केली. सदर देवस्थान विश्वस्त व्यवस्थेचे संपूर्ण प्रशासन व्यवहार, वित्तीय बाबी, संपत्तीचे संरक्षण तसेच भक्तांसाठीच्या सर्व सेवा-सुविधांचे व्यवस्थापन जबाबदारी पूर्वपार पाडावे, असे जिल्हाधिकारी यांना कळवले आहे.
जिल्हाधिकारी यांनी श्री शनैश्वर देवस्थान दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी कार्यकारी समितीची स्थापना केली आहे. यात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेवासा तहसीलदार संजय बिरादार व सदस्य म्हणून गटविकास अधिकारी संजय लखवाल, शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, गणेश खेडकर, राजकुमार पुंड, राजेंद्र वाकचौरे, विनायक गोरे, सतीश पवार व दादासाहेब बोरुडे यांचा समावेश आहे.
शनी मूर्तीवर तेल अर्पण करण्यासाठी चौथर्यावर जाण्यासाठी 500 रुपयांची पावती फाडावी लागते, पण अगोदर परिसरातील अनेक पदाधिकार्यांच्या नावावर मोफत दर्शन मिळत होते. आता समितीमध्ये असणार्या सदस्यांच्या आदेशानुसारच महत्वाच्या व्यक्तींना मोफत प्रवेश मिळणार आहे. त्यात मोठे अधिकारी, न्यायालय, आजी-माजी आमदार यांनाच मोफत दर्शन मिळणार असल्याचे बोलले जात आहे.




