Friday, September 20, 2024
Homeनगरशिर्डी विमानतळास जंगम मालमत्ता जप्तीचे वॉरंट

शिर्डी विमानतळास जंगम मालमत्ता जप्तीचे वॉरंट

थकीत कराची बाकी न भरल्याने काकडी ग्रामपंचायतीची कारवाई

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

- Advertisement -

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे असलेली थकीत कराची बाकी न भरल्याने जंगम मालमत्ता जप्तीचे वॉरंट काकडी ग्रामपंचायतीने विमानतळ प्रशासनास मंगळवारी दिले. कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळाकडे काकडी ग्रामपंचायतीची कराची रक्कम सातत्याने पाठपुरावा करुनही मिळत नसल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 129 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीने महाराष्ट्र विमान विकास प्राधिकरण कंपनी, मुंबई यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, कर बाकी भरण्याबाबत सातत्याने दिलेली पत्रे, फेब्रुवारी 2023 मध्ये दिलेले अंतिम स्मरणपत्र, 24 मार्च 2024 रोजी हुकूम नोटीस, 129 प्रमाणे दिलेली करवसुली नोटीस, राष्ट्रीय लोकअदालत नोटीस, ग्रामपंचायतीचा मासिक सभा ठराव देऊनही कर भरणा केलेला नाही. त्यामुळे आपल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे असलेली थकीत कराची वसुली करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 124 व कलम 129 अन्वये खालील नमूद मिळकतीप्रमाणे मागणी बिले, नोटीस, रिट हुकूम, लोकअदालत नोटीस बजावलेल्या आहेत, सदर थकबाकी वसुली करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 129 नुसार खालील प्रमाणे जंगम मालमत्ता असून सदरील जंगम मालमत्ता कराची थकबाकी न भरल्यामुळे मालमत्तांचे येणे आहे.

करपात्र जंगम मालमत्ता- आरसीसी पद्धतीचे घर टर्मिनल बिल्डिंग पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर टर्मिनल बिल्डिंग (पोर्च), आरसीसी पद्धतीचे घर पेव्हर ब्लॅक एरिया पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर इंडियन आईल पंप पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर सबस्टेशन बिल्डिंग पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर पॅावर (जेनरेटर बिल्डिंग) पहिला मजला, मनोरा तळ घर एटीसी टावर पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर रनवे पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर जीएसआर वॉटर टँक पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर वॉल कंपाउंड पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर पार्किंग रस्ता नं. 1 पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर पार्किंग रस्ता नं. 2 पहिला मजला, पडसर खुली जागा 823.50 एकर जागांवर ग्रामपंचायतीने 2016-17 पासून कर आकारणी केलेली आहे. 8 कोटी 30 लाख रुपये कराची रक्कम ग्रामपंचायत कार्यालयास जमा होत नसल्याने गावच्या सर्वांगीण विकासावर व दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे सदर थकबाकी वसुलीकरिता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 129 अन्वये जंगम मालमत्ता जप्ती वॉरंट बजावण्यात येत असल्याचे जप्ती वॉरंटमध्ये म्हटले आहे.

ग्रामपंचायतीने सातत्याने शिर्डी विमानतळाकडे कराच्या रकमेची मागणी केली. मात्र त्यावर त्यांनी कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव ग्रामपंचायतीला विमानतळास जप्तीचे वॅारंट द्यावे लागले आहे.
पुर्वा गुंजाळ, सरपंच काकडी-मल्हारवाडी

- Advertisment -

ताज्या बातम्या