शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डी शहरात कालिकानगर बाजारतळ परिसरात जुने मटन मार्केट येथे विक्रीसाठी आणलेले 1 लाख 40 हजार रुपये किमतीचे 700 किलो गोमांस पोलिसांनी पकडले. ईरोपींच्या दोन मोटार सायकल, 9 मोबाईल असा 2 लाख 60 हजारांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात पाच आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास शिर्डी शहरातील कालिकानगर बाजार तळ या भागात जुने मटन मार्केट जवळ नागरी वस्तीचे ठिकाणी खुलेआम गोवंशाचे गोमांस विक्रीचे दुकान मांडून काही लोक बसले असल्याची माहिती बजरंग दल, गोरक्षक दल राहाता प्रखंड यांना समजली. या कार्यकर्त्यांनी पोलिसांना माहिती दिली व पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांना याठिकाणी गोवंशाची कत्तल करून विक्रीसाठी आणलेले 700 किलो गोमांस मिळून आले.
राज्यात गोवंश जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना देखील मेहबूब शेरखान कुरेशी रा. कोपरगाव, सादिक लालू कुरेशी रा. ममदापूर, समीर आरिफ कुरेशी रा. कोपरगाव, सोहेल आयोग कुरेशी रा. कोपरगाव, मुस्ताक रफिक कुरेशी रा. ममदापूर या आरोपींनी संगनमत करून गोवंश जनावरांची कत्तल केलेल्या गोमांसाची विक्री करताना मिळून आले. त्यांच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद सुभाष सूर्यवंशी यांनी शिर्डी पोलिसांत फिर्याद दाखल केली.
या फिर्यादीवरून आरोपी विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 656/ 2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271 235/ 3,(5) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1995 चे सुधारित 2015 चे कलम 5(क) व नऊ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक ठाकूर, पो. कॉ. राजपूत, पो कॉ जराड, पो. कॉ. सूर्यवंशी, पो. कॉ. झरेकर या पोलीस कर्मचार्यांनी कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे.
शिर्डी परिसरामध्ये गोमांस सर्रासपणे विकले जात आहे हे आजच्या घटनेवरून सिद्ध होते. याबाबत बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, गोरक्षक दल या कार्यकर्त्यांना माहिती मिळते. मात्र पोलिसांना ही माहिती मिळत नाही. हे मोठे गौडबंगाल आहे. गोमांस विक्रीला साथ कुणाची?असा सवाल साईनगरी विचारत आहे.