शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साई संस्थानमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणार्या एका युवकाने बनावट दर्शन पास तयार करून त्या पासची विक्री केल्याप्रकरणी संस्थान प्रशासनाने त्या युवकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
साई संस्थानमधील बेटर कम्युनिकेशन मुंबई या कंपनीतील डिटीपी ऑपरेटर सागर रमेश आव्हाड हा साई संस्थानध्ये ऑपरेटर म्हणून काम करत होता. या कर्मचार्याने संगणकाच्या आधारे बनावट दर्शन पास तयार करून तो भाविकांना विकला. ही बाब संस्थान प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर सागर आव्हाड याच्यावर साई संस्थान प्रशासनाने जुजबी कारवाई करत निलंबन केले होते.
परंतु ग्रामस्थांनी हा प्रश्न उचलून धरल्याने अखेर बुधवारी साई संस्थान सुरक्षा विभागाचे पोलीस अधिकारी रोहिदास माळी यांनी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये सागर रमेश आव्हाड याच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (2023) नुसार 318(4), 335, 336(2), 340(2), 238 प्रमाणे गुन्हा निंदविण्यात आला आहे. या घटनेमध्ये आरोपीने सांगणकाच्या आधारे बनावट पास तयार करून तो भाविकांना विकला असला तरी याने बनावट पाससह मंदिरात प्रवेश करण्याअगोदर व्हेरीफिकेशन काउंटरवर तपासणीच्यावेळी हा पास बनावट असल्याचे निष्पन्न झाले. परंतु बहादराने तो पास फाडला आणि तेथून पळ काढला. मात्र साई संस्थांनच्या आयटी विभागाच्या अधिक्षिका सुनीता सोनवणे यांनी फाडलेल्या पासचे तुकडे एकत्र करून तपासले असता तो पास बनावट असल्याचा खुलासा केला. ही गंभीर बाब साई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज यांना कळाल्यावर त्यांनी दोषी सागर आव्हाड याच्यावर करावाई करत तात्काळ निलंबित केले.
या प्रकरणामध्ये कोण कोण सहभागी आहेत, यापूर्वी याने किती बनावट पास तयार करून विकले हा पोलीस तपासाचा भाग असला तरी यावर साई संस्थान सारख्या देवस्थानमध्ये यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी असा प्रकार रोखण्याकरिता विशेष पथक निर्माण करण्याची आवश्यकता आहे. या बनावट पास प्रकरणामुळे साई संस्थांनची व शिर्डीची देशपातळीवर बदनामी होते हे नाकारून चालणार नाही. याची दखल घेऊन यापुढे असे प्रकार घडू नये यासाठी साई संस्थान प्रशासनाने दक्ष राहणे गरजेचे आहे.
साई संस्थान मधील जनसंपर्क कार्यालय, देणगी काउंटर व इतर विभागात ज्या ठिकाणी संस्थानचा आर्थिक व्यवहार चालतो त्या विभागात प्रशासनाने सेवेत कायम असलेल्या कर्मचार्यांची नेमणूक करणे गरजेचे आहे. परंतु या विभागात अनेक कंत्राटी कर्मचारी काम करतात. त्यामुळे बनावट पास विक्री व इतर प्रकार घडल्याचे अनेकदा निदर्शनास आले. अशा प्रकारच्या घटना घडू नये याकरिता महत्त्वाच्या विभागात कायम सेवेत असलेल्या कर्मचार्यांचीच नियुक्ती करणे गरजेचे आहे.
– अभय शेळके, माजी उपनगराध्यक्ष शिर्डी