शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणार्या तरुण कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेनंतर काही काळ हॉटेल परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते, तर उपस्थित नागरिकांमध्ये भीती व हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव विशाल रवींद्र वायकर (वय अंदाजे 22 वर्षे) असे असून तो मूळचा संगमनेर तालुक्यातील रहिवासी आहे. रोजगारासाठी तो शिर्डीत आला होता व सध्या राहाता तालुक्यातील गणेशनगर येथे वास्तव्यास होता. विशाल हा शिर्डीतील एका हॉटेलमध्ये कामगार म्हणून काम करत होता.
सोमवारी दुपारपासून संबंधित हॉटेलमधील एका खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे हॉटेल व्यवस्थापनाच्या लक्षात आले. बराच वेळ उलटूनही दरवाजा न उघडल्याने आणि आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने व्यवस्थापनाची चिंता वाढली. अखेर संशय बळावल्याने तात्काळ शिर्डी पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचांच्या उपस्थितीत दरवाजा उघडण्यात आला असता, विशाल वायकर याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
पोलिसांनी घटनास्थळी सखोल पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड नोट आढळून आली आहे का, मोबाईलमध्ये काही संदेश, कॉल रेकॉर्ड किंवा मानसिक तणावाची कारणे आहेत का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेची शिर्डी पोलिसांकडून आकस्मात मृत्यूची नोंद व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.





