Tuesday, January 6, 2026
HomeनगरShirdi Municipal Election : शिर्डी नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर कोण...

Shirdi Municipal Election : शिर्डी नगरपरिषद निवडणूक : नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर कोण बाजी मारणार? थोरात की डॉ. आरणे?

शिर्डी (प्रतिनिधी)

संपूर्ण जगाचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी नगरपरिषदेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. २ डिसेंबर रोजी पार पडलेल्या या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले असून, भाजप (विखे पाटील गट) आणि लोकक्रांती सेना (पुरोहित गट) यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

शिर्डी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद हे केवळ राजकीयदृष्ट्याच नव्हे, तर धार्मिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. विधी व न्याय खात्याच्या तरतुदीनुसार, नगराध्यक्षांना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळात सदस्य म्हणून स्थान मिळते. या विशेष अधिकारामुळे अनेक राजकीय इच्छुकांची या पदावर वर्णी लागावी अशी इच्छा असते, ज्यामुळे यंदाची निवडणूक अधिकच चुरशीची झाली आहे.

YouTube video player

नगराध्यक्ष पदासाठी मुख्य लढत भाजपच्या सौ. जयश्री थोरात आणि पुरोहित गटाच्या लोकक्रांती सेना पॅनलच्या डॉ. कल्याणी आरणे यांच्यात दिसून येत आहे. या दोन्ही उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती. याशिवाय, नगरसेवकांच्या २१ जागांसाठी भाजप, लोकक्रांती सेना, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि अनेक अपक्ष उमेदवारांनी रिंगणात उडी घेतल्याने सर्वच प्रभागांमध्ये राजकीय वातावरण तापले होते.

शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्याने येथील लोकप्रतिनिधींना समाजात वेगळा मान मिळतो. साईभक्तांना दर्शनासाठी शिफारस पत्र देणे असो किंवा स्थानिक व्यवसाय (हॉटेल, लॉजिंग, प्रसाद विक्री) आणि रिअल इस्टेटमधील राजकीय वजन वाढवणे असो, या कारणांमुळे अनेकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. १० प्रभागांमध्ये झालेल्या या निवडणुकीत अनेक ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढती बघायला मिळाल्या.

नगरसेवक पदासाठी अनेक प्रभागात अपक्ष उमेदवारांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले आहे. यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मतदार नक्की कोणाच्या पारड्यात आपले मत टाकतील, याचा अंदाज बांधणे उमेदवारांनाही कठीण जात आहे. रविवारी होणाऱ्या मतमोजणीकडे आता संपूर्ण शिर्डीसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत जयश्री थोरात बाजी मारणार की डॉ. कल्याणी आरणे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

ताज्या बातम्या