शिर्डी (प्रतिनिधी)
साईबाबा संस्थानच्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या मेघा किचन असलेल्या प्रसादालयाने केवळ ४८ तासांत पावणेदोन लाख भाविकांना महाप्रसाद देत नवा इतिहास घडवला आहे.
दि. ३१ डिसेंबर ते १ जानेवारी या दोन दिवसांत साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात तब्बल १ लाख ६५ हजारांहून अधिक भाविकांनी मोफत महाप्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती संस्थान प्रशासनाने दिली. यामध्ये ३१ डिसेंबर रोजी सुमारे ८० ते ८५ हजार, तर २०२६ या वर्षातील पहिला गुरुवार असलेल्या १ जानेवारी रोजी ८० हजारांहून अधिक भाविकांनी प्रसाद घेतला.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला शिर्डीत दाखल झालेल्या भाविकांमुळे शहराच्या चारही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. साई मंदिर समोरील नगर मनमाड महामार्ग ‘नो व्हेईकल झोन’ केल्याने रस्त्यावर भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. साईनामाच्या गजराने संपूर्ण शिर्डी नगरी दुमदुमून गेली होती. ही गर्दी गेल्या सात-आठ वर्षांतील सर्वाधिक असल्याचे चित्र होते.
आशिया खंडातील या अद्वितीय मेघा किचनमध्ये दोन प्रहरांत सुमारे ८०० हून अधिक कर्मचारी, मदतनीस आणि २५ अनुभवी कूक अहोरात्र कार्यरत होते. अत्याधुनिक सोलर सिस्टीमच्या सहाय्याने अवघ्या ४८ तासांत पावणेदोन लाख भाविकांसाठी अन्न शिजवण्यात आले.एकावेळी साडेतीन हजार भाविकांची आसन क्षमता असलेल्या या प्रसादालयातील व्यवस्थापन पाहता अनेक भाविकांनी “हा बाबांचा चमत्कारच” अशी भावना व्यक्त केली.
३१ डिसेंबर रोजी भाविकांना शिरा, तर वर्षातील पहिला गुरुवार असल्याने साई आमटी आणि बालुशाही असा महाप्रसाद देण्यात आला. या चविष्ट व पौष्टिक महाप्रसादासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. राज्याच्या विविध भागांतून पायी चालत आलेल्या पदयात्रांनी देखील या महाप्रसादाचा मनोभावे आस्वाद घेतला. वर्षाच्या पहिल्याच गुरुवारी साई आमटी आणि बालुशाही चा स्वाद चाखताना भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान, भक्ती आणि कृतज्ञतेचे भाव स्पष्टपणे दिसून येत होते. दिवसेंदिवस या प्रसादालयात महाप्रसाद घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्याचेही निदर्शनास येत आहे.
या तीन दिवसीय भक्तीमय उत्सवात भाविकांना सुलभ दर्शन, सुव्यवस्थित प्रसाद आणि मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अहोरात्र कार्यरत होती.





