Sunday, May 3, 2026
HomeनगरShirdi : शिर्डी येथे साईबाबा पुण्यतिथी उत्सव उत्साहात सुरू

Shirdi : शिर्डी येथे साईबाबा पुण्यतिथी उत्सव उत्साहात सुरू

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 107 व्या साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला बुधवारी मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. यानिमित्ताने शिर्डीमध्ये भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. मुंबई-शिर्डी येथील साई द्वारकामाई मंडळाच्या वतीने तयार करण्यात आलेला साईरत्न हा समुद्रमंथनातून प्रकटलेल्या रत्नांवर आधारित भव्य आणि आकर्षक देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यासोबतच ओरिसा येथील दानशूर साईभक्त सदाशिव दास यांच्या देणगीतून मंदिर आणि मंदिर परिसरात करण्यात आलेल्या फुलांच्या सुंदर सजावटीनेही भाविकांना आकर्षित केले आहे.

- Advertisement -

उत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटे 5.15 वाजता श्रींची काकड आरती झाली. त्यानंतर पहाटे 5.45 वाजता साईबाबांच्या प्रतिमेची आणि पवित्र साईसच्चरित ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे यांनी विणा तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे आणि प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने साईभक्त उपस्थित होते.

मिरवणूक द्वारकामाई मंदिरात पोहोचल्यावर साईसच्चरित ग्रंथाच्या अखंड पारायणाला प्रारंभ झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी प्रथम अध्यायाचे वाचन केले, त्यानंतर इतर अधिकार्‍यांनी पुढील अध्यायांचे वाचन केले. सकाळी 7 वाजता समाधी मंदिरात गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक श्रींची पाद्यपूजा केली. दुपारच्या सत्रात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात पुणे येथील विजय घाटे यांचा साईभजने हा कार्यक्रम आणि नाशिक येथील हर्षाली देशपांडे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी 6.15 वाजता धूपारती झाली. रात्री 9.15 वाजता गावातून पालखीची सवडी मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि मिरवणुकीनंतर श्रींची शेजारती होईल. अखंड पारायणासाठी द्वारकामाई मंदिर रात्रभर उघडे ठेवण्यात येणार आहे.

आज गुरुवार 2 ऑक्टोबर हा श्रींच्या पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस आहे. या दिवशी पहाटे 5.15 वाजता श्रींची काकड आरती होईल. त्यानंतर 5.45 वाजता अखंड पारायणाची समाप्ती होईल आणि श्रींच्या फोटो व पोथीची मिरवणूक निघेल. सकाळी 6.20 वाजता श्रींचे मंगलस्नान आणि 7.00 वाजता पाद्यपूजा होईल. सकाळी 9 वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम होईल, तर सकाळी 10 वाजता शोभना देशपांडे यांचे कीर्तन होईल. सकाळी 10.30 वाजता श्रींच्या समाधीसमोर आराधना विधीचा कार्यक्रम संपन्न होईल. दुपारी 12.30 वाजता माध्यान्ह आरतीनंतर पुणे येथील बबलू दुग्गल आणि श्रीरामपूर येथील रोहित दुग्गल यांच्या भजन संध्येचे कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी 5 वाजता खंडोबा मंदिर येथे सीमोल्लंघन कार्यक्रम आणि 6.15 वाजता धूपारती होईल.

रात्री 7.30 ते 10.00 या वेळेत मुंबई येथील शैलेंद्र भारती यांचा साईभजन संध्या कार्यक्रम होईल. रात्री 9.15 वाजता गावातून श्रींच्या रथाची मिरवणूक काढण्यात येईल. रात्री 10.00 ते पहाटे 5.30 या वेळेत श्रींच्या समोर कलाकार हजेरी होईल. उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवले जाणार असल्याने 3 ऑक्टोबर रोजी पहाटे 5.15 वाजता होणारी काकड आरती होणार नाही, असेही संस्थानने स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सरकारी पाण्याच्या टँकरवर आता विशेष भरारी पथकांची नजर!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी खासगी जलस्त्रोत अधिगृहीत करण्याचे अधिकारी त्यात्या तालुक्याच्या तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात 30 पाण्याच्या टँकरद्वारे...