शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
साईबाबा संस्थानच्यावतीने सुरू असलेल्या शिर्डीतील एकशे सोळाव्या गुरूपौर्णिमा उत्सवाची सोमवारी दुपारी मध्यान्ह आरती व वेदश्री वैभव ओक डोंबिवली यांच्या काल्याच्या किर्तनानंतर दहीहंडी फोडून सांगता झाली. सोमवारी उत्सवाच्या सांगता दिनी संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर व वंदना गाडीलकर यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा केली. तर जिल्हा प्रधान न्यायाधीश तथा संस्थानचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा व मालती यार्लगड्डा यांच्याहस्ते गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्यात आली. काल्याच्या किर्तनानंतर साईबाबांचे समकालीन भक्त तात्या पाटील कोते यांचे वंशज राजेंद्र सुभाष कोते यांच्या हस्ते दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर, डेप्युटी सीईओ तुकाराम हुलवळे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदा प्रथमच गुरूपौर्णिमा उत्सवाला मोठी गर्दी झाली. संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर व पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे संरक्षण प्रमुख रोहिदास माळी यांनी गर्दीचे नियोजन केले. मात्र दर्शन रांगेचे नियोजन कोलमडल्याने भाविकांना दर्शन घेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला. संस्था सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी यांनी भाविकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने व्यवस्थित नियोजन केल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. साध्या वेषातील पोलीस आणि संस्थान सुरक्षा विभगाचे कर्मचारी दोन शिफ्ट मध्ये गर्दीमध्ये कार्यरत होते. परिणामी उचांकी गर्दी होऊनही मंदिर परिसरात तसेच रथमि रवणुकीत एकही चोरी झाली नाही.सोमवारी उत्सवाच्या सांगता दिवशी प्रसादालयात भोजनात मिष्टान्न भोजन म्हणून लापशी महाप्रसादात देण्यात आला.