Friday, November 22, 2024
Homeनगरशिर्डीतील अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज, पोस्टर्स यावर होणार कारवाई

शिर्डीतील अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज, पोस्टर्स यावर होणार कारवाई

ग्रामस्थांच्या निवेदनानंतर नगरपरिषद अ‍ॅक्शन मोडवर

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शहरात बेकायदेशीरपणे सार्वजनिक रस्त्यावर मालमत्तांवर बॅनर्स, होर्डिंग्ज, पोस्टर्स फोटो लावू नये तसेच नगरपरिषद हद्दीतील रस्ते चौक सार्वजनिक जागा यांचे परस्पर नामकरण करू नये अन्यथा या विरोधात सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्यान्वये तसेच सर्वोच्च न्यायालय आदेशाचे अवमान झाले प्रकरणी कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी दिला. शिर्डी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानंतर नगरपरिषद कारवाई करण्यासाठी अ‍ॅक्शन मोडवर आली आहे.

- Advertisement -

शहरात अनधिकृतपणे लावले जाणारे पोस्टर्स, बॅनर, होर्डिंग्ज यासंदर्भात मुख्याधिकार्‍यांनी जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे, शहरात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच शहरातील विविध मंडळे सार्वजनिक मालमत्तांवर अनधिकृतपणे झेंडे, पोस्टर्स, बॅनर, होर्डिंग्ज, फोटो, लावत असल्याचे नगरपालिका प्रशासनाचे निदर्शनास आले आहे. तसेच अनेक चौक, रस्ते, सार्वजनिक जागा यांचे नामकरण देखील परस्पर होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. हे कृत्य नियमबाह्य व बेकायदेशीर आहे. सार्वजनिक जागांना अनधिकृतपणे नाव देणे हे सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा 1995 चे कलम 3 अन्वये गंभीर गुन्हा आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांनी देखील अनधिकृत झेंडे, पोस्टर्स, बॅनर, होर्डिंग्ज, फोटो यावर कारवाई करणे बाबत निर्देश दिले आहे. या कारवाईवर न्यायालय लक्ष ठेवून असते. त्याबाबत आढावा सुद्धा न्यायालय घेत असते.

कायदेशीर बाबींचे तसेच न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तसेच विविध संघटना व मंडळे यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी याबाबत विशेष खबरदारी घ्यावी. पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडून बेकायदेशीर केलेल्या कृतीमुळे संबंधित राजकीय पक्षाद्वारेच असे कृत्य केले याबाबतचा संदेश जातो. त्यामुळे असा चुकीचा संदेश जाऊ नये, तसेच कायद्याचे उल्लंघन होऊ नये म्हणून अनधिकृत व बेकायदेशीरपणे झेंडे, पोस्टर्स, बॅनर, होर्डिंग्ज फोटो लावू नये अगर कुठल्याही रस्त्यांचे चौकाचे सार्वजनिक जागांचे परस्पर नामकरण करू नये.

अन्यथा नगरपरिषद प्रशासनाला नाईलास्तव सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंधक कायदा 1995 अन्वये तसेच सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवमान झाल्याप्रकरणी संबंधितावर कारवाई करावी लागेल. तसेच आपण स्वतः व आपले इतर कार्यकर्त्यांना याबाबतची माहिती अवगत करून व निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी केले आहे.

शिर्डी शहरात बेकायदेशीर अनधिकृत लावली जाणारी फ्लेक्स बोर्डवर नगरपरिषदेने ठराव प्रमाणे बंदी घालावी याकरिता मुख्याधिकार्‍यांना निवेदन दिले होते. याप्रश्नी मुख्याधिकार्‍यांनी सकारात्मक पाऊल उचलून शहरात बेकायदेशीर फ्लेक्स लावणारे तसेच सार्वजनिक जागांचे परस्पर नामकरण करणारे यांचेवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतल्यामुळे या निर्णयाचे साईभक्त तसेच ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

  • अमृत गायके, ग्रामस्थ
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या