मुंबई | Mumbai
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट वादात शिवसेना निवडणूक चिन्ह (Shiv Sena Election Symbol) धनुष्यबाण (Dhanushyaban) कोणाचे? या प्रश्नावर केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission of India) आज निर्णय घेण्याची शक्यता आहे.
शिवसेना नक्की कोणाची याबाबत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोन्ही गटांना पुरावे सादर करण्यासाठी आयोगाने दिलेली मुदत आज संपुष्टात येत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सादर झालेल्या पुराव्यांची पडताळणी करुन निवडणूक आयोग आजच काय तो फैसला करणार का? याबाबत उत्सुकता आहे.
त्यातच शिंदे गटाने अर्ज करुन उद्धव ठाकरे गटाकडे पुरेसे पाठबळ नसताना त्यांच्याकडून धनुष्यबाण या चिन्हाचा अंधेरी पोटनिवडणुकीत चुकीच्या पद्धतीने वापर केला जाईल असा दावा केला आहे. याच कारणामुळे तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
दरम्यान शिवसेनेतल्या सत्तासंघर्षात निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला, तर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटांना कोणतं चिन्ह मिळेल याविषयी राजकीय वर्तुळात खुमासदार चर्चा सुरु झाली आहे. दोन्ही गटांच्या दसरा मेळाव्यांवर नीट नजर टाकली तर शिंदे गटाचा कल तलवारीकडे आणि ठाकरे गटाचा कल गदा या चिन्हाकडे आहे का अशी चर्चा सुरु आहे.