नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक
महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता आकडेमोड सुरू झाली असून, प्रत्येक जण लाभ-हानीच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. विजयी उमेदवार मिळालेल्या मतांपैकी किती कमी झाले याची, तर पराभूत आपली मते गेली कुठे याची कारणमीमांसा करण्यात गुंतले आहेत. कोणी काम केले आणि कोणी काम दाखविले याचाही आढावा घेतला जात आहे. ‘वरून कीर्तन आतून तमाशा’ करण्यात कोण-कोण पुढे होते, याचाही धांडोळा घेतला जात आहे. पालिका निवडणुकीनंतरचे असे कवित्व नेहमीप्रमाणे बराच काळ चालत राहील. पक्षांनीही आपापल्या कुवतीप्रमाणे यश मिळविले असले तरी कोण कुठे कमी पडले याचे अहवाल तयार केले जात आहेत.
भाजपने आपल्या ४४ जागा का, कशा पडल्या याच्या कारणांचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्याचे ठरविले आहे, तर एबी फॉर्म वाटपावेळी झालेल्या गोंधळाचीही एकीकडे चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले जाते. अर्थात, भाजपने मोठे यश मिळविले असल्याने आता असल्या चौकशा म्हणजे केवळ फार्स ठरणार यात शंका नाही. मात्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा अपेक्षाभंग हा नेत्यांच्या भलताच जिव्हारी लागला असून त्याची कठोर छाननी केली जाणार आहे. अर्थात हे खरे, की काहींना आतापासूनच टेन्शन देण्याचा तो एक डावपेच आहे, हे कळायला मार्ग नाही. शिवसेना याबाबत काय करायचे ते करीलच; परंतु ज्यांच्या विजयाची सर्वाधिक शक्यता व्यक्त केली जात होती, त्या शिंदेंच्या शिवसेनेला पावशतकापर्यंतच मजल मारता आली याच्या कारणांचा मात्र शोध घ्यावा लागणार आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून फुटून स्वतंत्र पक्षाची स्थापना केल्यानंतर जवळपास वर्षभर त्यांच्या नव्या पक्षात इनकमिंग सुरू होते.
अगदी सुरुवातीच्या हाकेला ओ देणारे तसेच नंतर परिस्थितीनुरुप येत गेलेले असा एक संघर्ष गेली काही महिने पक्षात आहे. महापालिका निवडणुकीत तर तो प्रकर्षाने दिसला. भाजपबरोबरच्या जागावाटपासंदर्भात पक्षात असे विविध विचारांचे गट होते. काहींना युती नको असे वाटत होते, काहींचा काहीही झाले तरी युती व्हावी असा ठाम आग्रह होता. काहींनी किमान पन्नास जागा मिळाल्या तरच युती करावी असा हेका धरला होता. भाजपने शिवसेनेतील ही दुही नेमकी हेरल्याने त्यांनी जागावाटपाच्या चर्चेचे गुर्हाळ चालू ठेवले. शिवसेनेला युतीसाठी ताटकळत ठेवले, तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही. मुळात, भाजपचे गेल्या खेपेस ६६ नगरसेवक निवडून आलेले असताना व नंतर दहा जणांनी पक्षप्रवेश केलेला असल्याने तीस ते पस्तीस पलिकडे जागा देणे त्यांना शक्यही नव्हते. हे ओळखून शिवसेनेने काही वेगळी व्यूहरचना करणे गरजेचे होते. त्यांचा प्लान बी अंमळ उशीराच अंमलात आला.
आपल्या ताकदीचा भलताच भ्रम झाल्याने काही जण सत्ता आपलीच या अहंकारात राहिले. शिवसेनेकडे मोठ्या संख्येने इतर पक्षातील नगरसेवक जात होते, ही वस्तुस्थिती असली तरी त्यातील किती प्रभावी वा सक्षम आहेत, याचा विचार न करताच गणिते मांडली गेली. प्रत्यक्षात, भाजप जेवढ्या जागा देऊ पहात होती, त्याच्या आसपासच शिवसेनेला मतदारांनी जागा दिल्यामुळे भाजपचे निष्कर्ष अधिक अचूक असल्याचे दिसते. एकीकडे स्वबळाची भाषा शिवसेनेकडून केली गेली आणि दुसरीकडे मात्र ऐनवेळेस इतर पक्षातून आलेल्या अनेकांना उमेदवारी द्यावी लागली. हा प्रयोग सर्वच पक्षांनी केलेला असल्याने शिवसेनेला त्याबद्दल फारसा दोष देता येणार नाही, पण पक्षात मोठ्या प्रमाणावर लोक येत असताना निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची योग्यायोग्यता तपासणे गरजेचे होते. शिवाय सुरुवातीला म्हटले त्याप्रमाणे दोन-तीन गटांच्या आपसातील वर्चस्वसंघर्षाचाही फटका उमेदवार निवडीत बसला. प्रभाग १८ मध्ये उबाठातून सुरुवातीलाच आलेल्या ज्येष्ठ नगरसेविका रंजना बोराडे यांना अधिकृत उमेदवारी दिली गेली; परंतु ऐनवेळी उबाठाच्या तीन-चार इच्छुकांनीही प्रवेश करून एका गटाच्या वशिल्याने उमेदवारीही मिळविली.
बोराडे यांनी आधी अर्ज दाखल केलेला असल्याने त्या अधिकृत ठरल्या तर ताकाटे यांचा पक्षाचा अर्ज फेटाळला गेला. परंतु संबंधित पॅनलमधील इतर तिघांनी बोराडे यांना बाजूला करून ताकाटे यांना सोबत घेत प्रचार करायला सुरुवात केली. बोराडेंनी याविषयी वरिष्ठस्तरावर तक्रार केली; पण त्याची कोणीच दखल घेतली नाही. पती प्रकाश बोराडे यांचे करोनाकाळात निधन झालेले असल्याने त्या तशाही एकट्या पडल्या होत्या. यासंदर्भात शिवसेनेने लाडक्या बहिणीवरच कसा अन्याय केला, याची चर्चा सुरू झाली आणि बोराडेंकडे सहानुभूतीचा ओघ सुरू झाला. त्या अखेरीस निवडूनही आल्या. आता त्यांना पक्षात पावन करून घेतले जाईलही. परंतु, त्यांना आलेला वाईट अनुभव त्या विसरणे शक्य नाही. हे का झाले तर पक्षातील एका गटाने नाशिकरोड विभागातील उमेदवार आपणच ठरविणार असा हेका धरून आपल्या मर्जीतील उमेदवार दिले. पक्षाचे नेते दादा भुसे देखील अशा प्रसंगी हतबल झाले. पक्ष संघटनेतील वर्चस्वसंघर्षात पक्षाला आणखी काही ठिकाणी फटके बसले. आता त्याची व्यक्ती न पाहाता वस्तुस्थितीदर्शक छाननी झाली तरच पुढील काळात नामुष्की टळू शकेल.




