Thursday, May 2, 2024
Homeनगरशिवप्रहारचे साईबाबा रुग्णालय प्रवेशद्वारावर उपोषण

शिवप्रहारचे साईबाबा रुग्णालय प्रवेशद्वारावर उपोषण

उपचाराअभावी वृद्ध महिला 11 दिवस रुग्णालयाच्या बाहेरच

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – सहा ते सात ठिकाणी खुब्यात मोडलेल्या 65 वर्षीय वृद्ध आजीबाईंना उपचाराअभावी चक्क 11 दिवस साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या बाहेर मुक्काम ठोकावा लागला तरीसुद्धा तिच्यावर उपचार करीत नसल्याचे लक्षात येताच शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर लाक्षणिक आंदोलन सुरू केल्यानंतर तातडीने या वृद्ध आजीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची घटना घडली.

- Advertisement -

दरम्यान जालना जिल्ह्यातील 65 वर्षीय वृद्ध महिलेस खुब्यात सहा ते सात ठिकाणी मोडले असून असह्य वेदना सहन करत तिने साईबाबांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या बरोबर नातेवाईकांना घेऊन 10 दिवसांपूर्वी शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल झाल्या. आज भरती केले जाईल उद्या करू असे अनेक कारणांचा सपाटा तेेथील कर्मचारी व अधिकार्‍यांनी लावल्याने त्या आजीला न्याय मिळत नसल्याचे स्पष्ट झाले. ही बाब शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले यांच्या कानावर पडताच त्यांनी क्षणाचा विलंब न करता रुग्णालयात धाव घेऊन सदर वृद्ध आजीबाई व तिच्या बरोबर असलेल्या नातेवाईक यांची भेट घेतली. यावेळी सदर प्रसंग आणि येथील कर्मचार्‍यांच्या उद्धटपणाच्या वागणुकीबद्दल सांगितले. चौगुले यांनी त्यांचे सर्व ऐकून घेतल्यानंतर

संघटनेच्या कार्यकर्त्यांना बोलावून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर लाक्षणिक आंदोलन सुरू केले. आंदोलनाची खबर वैद्यकीय अधिकारी यांना मिळताच वैद्यकीय अधिकारी डॉ विजय नरोडे, डॉ. प्रीतम वाडगावे यांनी रुग्णालयाच्या बाहेर येऊन त्या वृद्ध आजीबाईची चौकशी केली आणि चौगुले यांच्या मागणीप्रमाणे सदर वृद्ध महिला तसेच बाहेरून आलेल्या अनेक गोरगरीब रुग्णांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान त्या दुर्धर आजाराने ग्रासलेल्या आजीबाईंना चालता येत नसताना तिला इतक्या यातना सहन कराव्या लागल्या ही घटना साईबाबांच्या रुग्णसेवेला हरताळ फासणारी असल्याचे चौगुले यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकारी यांनी या वृद्ध महिलेवर तातडीने उपचार करण्याचे आदेश दिले असे असले तरी अनेक गरीब रुग्ण आज असे आहेत की त्यांना आजही उपचारासाठी या रुग्णालयाचे वारंवार उंबरठे झिजवण्याची वेळ ओढवली आहे मात्र अजूनही त्यांना न्याय मिळत नाही. प्रत्येकासाठी सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करतील आणि मगच त्यांना न्याय मिळेल का? असा सवाल ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या