Thursday, May 2, 2024
Homeनगरगणेशच्या भाडेतत्वाबाबतची याचिका मागे घेतली जात नाही, तोपर्यंत नवीन करार नाही -...

गणेशच्या भाडेतत्वाबाबतची याचिका मागे घेतली जात नाही, तोपर्यंत नवीन करार नाही – खा. डॉ. विखे

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

गणेशच्या भाडेतत्वाबाबत उच्च न्यायालयात काहींनी याचिका दाखल केली आहे. ती याचिका संगमनेरमध्ये तयार झाली आहे. ती याचिका जोपर्यंत मागे घेतली जात नाही. तोपर्यंत गणेश बरोबरच्या भाडेतत्वाबाबत आपण बोलणार नाही, असे प्रतिपादन खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.

- Advertisement -

श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षस्थानी गणेशचे अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ होते. माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, भाउसाहेब जेजुरकर, संचालक अ‍ॅड. रघुनाथ बोठे, अशोकराव दंडवते, अ‍ॅड. भाऊसाहेब शेळके, मधुकराव कोते, विजय गोर्डे, नितीन गाढवे, जे. आर. चोळके, अण्णासाहेब सदाफळ, भैय्यासाहेब गोरे, भारतीताई गोरे, विलास डांगे, नलिनी डांगे, सरस्वती दाभाडे, बाळासाहेब दाभाडे, सुदाम सरोदे, विशाल चव्हाण, राजेंद्र थोरात, सुर्यकांत निर्मळ, गणेशचे कार्यकारी संचालक अभिजीत भागडे आदी उपस्थित होते. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांसह विविध अभिनंदनाचे ठराव एकमताने संमत करण्यात आले.

या सभेत शेतकरी संघटनेचे विठ्ठलराव शेळके, जिल्हा शेतकरी संघटनेचे अशोकराव पठारे, भगवानराव नळे, रावसाहेब गाढवे, विजयराव वहाडणे, निळवंडे कृती समितीचे नानासाहेब शेळके, ओमेश जपे, उत्तमराव घोरपडे, शिवाजी अनाप या सभासदांनी भावना व वास्तविकता मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भाषणांचे उल्लेख करत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी अभ्यासपूर्ण उत्तरे देत ते म्हणाले, गणेशच्या मागील हंगामातील शेतकर्‍यांच्या ऊस तोडणीबाबत गैरसोय झाली. ऊस नियोजन कोलमडले याला संचालक मंडळ जबाबदार नाही. ज्यावेळी गणेश भाडेतत्वावर चालवायला घेतला त्यावेळी तो 1700 मेट्रीक टनाची गाळप क्षमता होती.

कामगारांचा पगार प्रतिटन किती होता, हे चर्चा करायला विसरलो. जे कारखाने चांगल्या पध्दतीने चालू आहे. त्या ठिकाणी कामगारांचा पगार गाळप प्रतिटन 250 रुपये इतका आहे. गणेशमध्ये कामगारांच्या पगाराचा बोजा प्रतिटन 450 रुपये आहे. तरीही कामगार जगवायचे, त्यांनी कष्ट केले. आधुनिकीकरण करुन कारखान्याची गाळप क्षमता 3000 मेट्रीक टन इतकी केली. प्रवराचे आधुनिकीकरण केले 7 हजार मेट्रीक टन प्रतिदिनी चालविला. राहुरीचे केले तो 4 हजार मेट्रीक टनाने चालला. गणेशमध्ये 10 कोटी गुंतवणूक करुनही गणेश 3 हजार टनी केला तरी तो व्यवस्थित चालला नाही.

गणेश कारखाना चांगला चालावा म्हणून ना. विखे पाटील यांनी 25 कोटी रुपये खर्च केले. गणेशचे काही सभासद भाडेतत्वावरील करार वाढवू नये म्हणून कोर्टात गेले आहेत. उच्च न्यायालयात जात असतील तर आम्हाला या कारखान्यात फार रस नाही. याचिका दाखल असल्याने सुनावणी चालू आहे. ज्यांनी याचिका दाखल केली त्याचे नावे मी वाचणार नाही. कारण ती याचिका संगमनेरमध्ये तयार झाली आहे. जे याचिकेकर्ते आहेत त्यांचे एक टिपरू ऊस या कारखान्याला नाही. जे ऊस घालतात, त्यांचा आम्ही सन्मान करु, पण जे टिपरूही घालत नाही. जे भाडेतत्वावर टीका करतात, त्यांच्या टिकेला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही.

अध्यक्ष मुकूंदराव सदाफळ म्हणाले, विखे पाटील कारखान्याने गणेश चांगला चालविला. प्रवरेने कारखाना चालविल्याने गणेशचा तोटा कमी झाला. पुढील वर्षी चांगले गाळप झाले तर गणेशचा तोटा आणखी कमी होईल. ढगफुटी पावसाने फळबागा, चारा पिके, खरीप पिके यांचे मोठे नुकसान झाले. या सर्वांचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना मदत द्यावी, असेही सदाफळ म्हणाले.

याप्रसंगी अण्णासाहेब म्हस्के यांचे भाषण झाले. आभार अ‍ॅड. रघुनाथ बोठे यांनी मानले. याप्रसंगी कैलास सदाफळ, राहुल सदाफळ, अ‍ॅड. रवींद्र सदाफळ, सागर सदाफळ, वाल्मिक गोर्डे, सुभाष गमे, पी. डी. गमे, राजेंद्र पठारे, ज्ञानदेव चोळके, बापुसाहेब लहारे, संदिप लहारे, डॉ. धनंजय धनवटे, विजय धनवटे, नानासाहेब बोठे, साहेबराव गाडेकर, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सतीश बावके, भारत लोखंडे, दत्तात्रय घोगळ, दिपक रोहोम, आर. बी. चोळके, सुरेश गाडेकर, सुनील गमे, बाळासाहेब गमे, शरद मते, वाल्मिक बोठे, मच्छिंद्र गाडेकर, प्रदीप चोळके, संजय चोळके आदींसह सभासद उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या