Saturday, July 25, 2026
HomeनगरShrigonda : श्रीगोंद्याच्या राखीव जंगलावर तस्करांचा घाला!

Shrigonda : श्रीगोंद्याच्या राखीव जंगलावर तस्करांचा घाला!

दररोज 4-5 टन लाकूड चोरीचा आरोप || वन्यजीवांच्या अधिवासावर संकट

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा शहराजवळील अढळगाव रस्त्यालगत असलेल्या सुमारे 25 हेक्टर राखीव वनक्षेत्रातून राजरोसपणे झाडांची कत्तल सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. हॉटेल व ढाब्यांवरील जळणासाठी निलगिरी, सुबाभूळ तसेच इतर जंगली झाडे मोठ्या प्रमाणात तोडली जात असून, दररोज किमान चार ते पाच टन लाकूड गायब होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

- Advertisement -

यामुळे भविष्यात वन्यजीवांच्या अस्तित्वावर धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात राखीव वनक्षेत्र आहे. मात्र अनेक ठिकाणी जंगलाच्या कडील भागात अतिक्रमण, रस्ते तयार करणे तसेच जळणासाठी झाडे व झुडपे तोडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागाची यंत्रणा असली तरी ती प्रभावीपणे कार्यरत नसल्याची टीका होत आहे. वनक्षेत्रातील अधिवास कमी होत असल्याने हरिण, काळवीट, तरस, कोल्हे यांसारख्या वन्य प्राण्यांसह बिबट्यांनाही शेती क्षेत्र आणि मानवी वस्त्यांकडे वळावे लागत आहे. नागरी वस्तीच्या परिसरात बिबट्यांचा वावर वाढत असल्याने शेतकर्‍यांच्या जनावरांना धोका निर्माण झाला आहे. तसेच शेतात काम करताना बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी चिंतेत आहेत.

श्रीगोंदा शहरापासून अवघ्या पाच ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या अढळगाव रस्त्यालगतच्या राखीव वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगली वृक्ष असल्याने येथे वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास टिकून आहे. मात्र अलीकडच्या काळात या भागातील मोठ्या झाडांवर लाकूड तस्करांची नजर पडली असून, मागील काही दिवसांपासून दुपारी व संध्याकाळी मशीनच्या साहाय्याने झाडे तोडली जात असल्याचे सांगितले जात आहे.

माहिती दिल्यास तातडीने कारवाई
वन परिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) दीपाली भगत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून संबंधित भागात तपासणी व कारवाईसाठी पथके पाठवली जात आहेत. मात्र झाडे तोडणारी टोळी अद्याप हाती लागलेली नाही. नागरिकांनी झाडतोड सुरू असताना तात्काळ माहिती दिल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

ताज्या बातम्या

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा टॉर्च मार्च

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने आज टॉर्च मार्च काढण्यात आला.सायंकाळी 6 वाजता कॅनडा कॉर्नर येथून...