Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीगोंदा बाजार समिती सचिवाच्या निलंबनाचा ठराव मंजूर

श्रीगोंदा बाजार समिती सचिवाच्या निलंबनाचा ठराव मंजूर

श्रीगोंदा|तालुका प्रतिनिधी|Shrigonda

शुक्रवार 24 जुलै रोजी कृषिउत्पन्न बाजार समितीची मासिक सभा झाली. सभा होण्यापूर्वीच उपसभापती पाचपुते आणि संचालक नाहाटा आमने-सामने आले होते. यामुळे चर्चेत आलेल्या या सभेमध्ये बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांचे निलंबन करण्यात आले.

- Advertisement -

त्यांचा पदभार उपसचिव संपत शिर्के यांच्याकडे देण्यात यावा असा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. तर 11 लिंबू व्यापार्‍यांचे रद्द केलेले परवाने पुन्हा पूर्ववत करण्यास 12 संचालकानी मंजुरी दिली. 18 पैकी एक संचालक गैरहजर होते.

कृषिउत्पन्न बाजार समिती मागील काही दिवसांपासून चर्चित होती. सचिव दिलीप डेबरे यांनी स्वतःचा वाढविलेला पगार यात त्यांच्या विरोधात कारवाईसाठी उमेश पोटे यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. याबाबत सचिव दोषी असल्याने संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांना निलंबित करण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला गेला. पाच संचालकांची चौकशी समिती नेमण्याचे ठरले असून या काळात सचिव हे घोगरगाव येथील उपबाजारमध्ये काम करतील.

लिंबू व्यापार्‍यांनी लिलाव न करण्याची भूमिका घेतली होती. शेतकरीविरोधी भूमिका असल्याने 11 लिंबू व्यापार्‍यांचे परवाने रद्द करावेत, ही ठाम भूमिका उपसभापती वैभव पाचपुते यांनी मांडली. मात्र या व्यापार्‍यांचे परवाने रद्द करताना इतर संचालकांना विश्वासात घेतले नाही. परस्पर निर्णय घेतला असल्याचे मीनाताई आढाव यांनी विषय मांडला. यावर लिंबू व्यापार्‍यांचे परवाने पुन्हा पूर्ववत करावेत, असा ठराव मंजूर करण्यात आला.

उपसभापती वैभव पाचपुते यांनी हातावरील शिल्लक रकमेचा विषय मांडला त्याबाबत त्यांनी माजी सभापती नाहाटा यांच्यावर आक्षेप घेतला. तसेच श्रीराम अ‍ॅग्रो यांना दिलेला भूखंड तसेच काष्टी उपबाजार समितीमधील गाळा विक्री रद्द करण्याचेही या सभेमध्ये ठरले. या बैठकीला संचालक धनसिंग भोइटे, वैभव पाचपुते, संजय जामदार, मीनाताई आढाव, लक्ष्मण नलगे, सतीश पोखरणा, उमेश पोटे, संजय महांडुळे, शैला काटे, उर्मिला गिरमकर आदी संचालक उपस्थित होते.

बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते यांच्या विरोधात 18 पैकी 12 संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. यासाठी 29 जुलै रोजी बैठक होणार आहे. आपण या अविश्वास ठरावाला सामोरे जाणार असून आपण शेतकरी हिताचे निर्णय घेत आलो असल्याचे उपसभापती वैभव पाचपुते यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या