संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
धांदरफळ प्रकरणावरून राजकीय धूसफूस सुरू असताना संगमनेरचा पारा पुन्हा एकदा ‘थप्पडकांड’मुळे चढला आहे. भाजपचे शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले यांना शिवसेनेचे (उबाठा) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी फटका मारल्यावरून सुरू झालेला वाद पोलिसांत पोहचला होता. या प्रकरणानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आ.बाळासाहेब थोरात आक्रमक झालेले दिसून आले. दरम्यान, याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचेे वातावरण झाले होते. अर्ज दाखल झाल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील निघाले होते. ही घटना कळल्यानंतर ते पुन्हा मागे फिरले. त्यांनी पोलीस स्टेशन गाठून आक्रमक पावित्रा घेतला होता. यावेळी त्यांनी कडक कारवाईची मागणी केली.
अमर कतारी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सत्यजीत तांबे यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी शहर पोलिसांत धडक दिली. चुकीचे गुन्हे दाखल न करण्याची मागणी त्यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्याकडे केली.
दरम्यान, मंत्री विखे यांची भाजपमध्ये येण्याची ऑफर अनेकदा नाकारल्याने माझ्यावर सूड भावनेतून कारवाई केल्याचा आरोप अमर कतारी यांनी केला. याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असलेले भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले यांनी आपली दुचाकी एका ओळखीच्या ठिकाणी लावली. त्यानंतर ते पायी जात असताना एका चहाच्या दुकानावर थांबून गप्पा मारत होते. त्याचवेळी अचानक पाठीमागून मानेवर कोणत्या तरी वस्तूने जोराचा फटका बसला. त्यावेळी चष्मा खाली पडला आणि मागे वळून पाहिले तेव्हा शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कन्हैयालाल कतारी (रा. कतारी गल्ली, संगमनेर) उभा होता. त्यावेळी शिव्या का दिल्या, असा जाब कतारी विचारत होता.
त्यानंतर कतारी सोबत असलेल्या साथीदारासह दुचाकीवरुन निघून गेला. यानंतर मानेवर लागलेले पाहत असताना गळ्यातील सोन्याचा गोफ दिसला नाही. तेव्हा जमिनीवर आजूबाजूला शोध घेतला असता तो मिळून आला नाही. हा गोफ कतारी यानेच नेला असल्याचे अॅड. गणपुले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अॅड. श्रीराम गणपुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांत अमर कतारीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, उशिरा रात्री कतारी यांची तक्रार शहर पोलिसांनी दाखल केली. त्यावरून शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांच्याविरुद्ध विविध कलमान्वय गुन्हा दाखल झाला. महाविकास आघाडीची जास्त बाजु घेतो. तुझ्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल केले आहेत. तुझा माज जिरलेला नाही, असे म्हणून शिवीगाळ करून धक्काबुकी केली. जीवे मारण्याची धनकी दिली, तसेच गळ्यातील 80 हजार रुपये किमतीची सोन्याची चैन ओढून घेतली आहे, असे कतारी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी गणपुले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
हल्ले सहन करणार नाही
उबाठा काय आणि खुबाटा काय हे सगळे सारखेच आहेत. हल्लेखोर महाविकासच्या पाकिटावर काम करणारे आहेत. हॉटेल व्यवसायाआडून अवैध धंदे करतात. आमच्या कार्यकर्त्यांवरील हल्ला कदापि सहन करणार नाही, असे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी यावेळी बजावले.