श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीत महाआघाडी काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार आ. लहु कानडे, शिंदे शिवसेनेचे माजी आ. भाऊसाहेब कांबळे, अपक्ष सागर बेग अशी चौरंगी लढत पहायला मिळाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीमध्ये काँग्रेसचे हेमंत ओगले यांचा 13 हजार 373 मतांनी विजय झाला. ओगले यांना 66 हजार 099 मते मिळाली. या विजयाने ओगले यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचा गड कायम राखला आहे.
श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीत चौरंगी झालेल्या अटीतटीच्या लढतीत महाआघाडी काँग्रेस चे उमेदवार हेमंत भुजंगराव ओगले यांना 66 हजार 099 मते मळाली. त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार माजी आ. भाऊसाहेब मल्हारी कांबळे (52728 मते) यांचा 13 हजार 373 मतांनी पराभव केला. अपक्ष उमेदवार सागर अशोक बेग यांनी 47860 मते घेऊन तिसर्या क्रमांकाची मते मिळविली तर विद्यमान आमदार महायुती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अधिकृत उमेदवार आ. लहू नाथा कानडे (42571 मते) चौथ्या क्रमांकावर गेले. हेमंत ओगले यांच्या या विजयाने काँग्रेसचा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यात माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे यांचे वारसदार उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या संघटनेला मोठे यश आले आहे. या निवडणुकीत 675 मतदारांनी नोटा पर्यायाला पसंती दिली आहे. चौरंगी झालेल्या अटीतटीच्या लढतीत हेमंत ओगले, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, अपक्ष उमेदवार सागर बेग व विद्यमान आ. लहु नाथा कानडे यांच्यातच चुरस पहायला मिळाली. वंचीत आघाडीचे आनंद मोहन (2222 मते) वगळता एकही उमेदवार दोन हजारांचा आकडा पार करू शकला नाही.
येथील प्रशासकीय इमारतीत मतमोजणीला सकाळी आठ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मिलींदकुमार वाघ आदींच्या मार्गदर्शनाखाली प्रारंभ झाला. 14 टेबलवर क्रमाक्रमाने 1 ते 23 फेर्यांची मतमोजणी करण्यात आली. पहिल्या पाच फेर्यांमध्ये माजी आ. भाऊसाहेब कांबळे आघाडीवर होते. पाचव्या फेरी अखेर कांबळे यांना 1747 मतांची आघाडी होती. परंतु सहाव्या फेरीत अचानक हेमंत ओगले यांनी 2407 मतांची आघाडी घेतली. तर सातव्या फेरीत ओगले यांची आघाडी 6870 मतांवर जावून ठेपली. पुढे ती अखेरपर्यत वाढतच राहिल्याने त्यांचा विजयी रथ अडविण्यात सर्वच उमेदवार अपयशी ठरले. विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येवून ठेपली तरी महायुती व महाविकास आघाडी यांनी श्रीरामपूरचे उमेदवार घोषित केले नव्हते. तिकीट कुणाला यावरुन येथील घोळ कायम होता. शेवटी महाआघाडीकडून काँग्रेसचे तिकीट विद्यमान आमदार लहु कानडे यांना नाकारून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले यांना जाहीर करण्यात आले. त्यामुळे ऐनवेळी लहु कानडे यांनी महायुतीकडून राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून उमेदवारी मिळविली.
आगोदरच श्रीरामपूरची जागा महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाला सोडण्यात आली असल्याची चर्चा होती. माजी आ. भाऊसाहेब कांबळे हे निवडणुकीच्या तयारीलाही लागले होते. परंतू पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी महायुतीचे प्रमुख उमेदवार लहु कानडे असल्याचे घोषित केले, आणि भाऊसाहेब कांबळे यांना माघार घेण्यास सांगितले होते. परंतु माघारीच्या दिवशी कांबळे हे नॉट रिचेबल राहीले. मुख्यमंत्र्यांचा आदेश आला तरी माघार नाही, अशी भुमिका त्यांनी घेतली. तसेच हिंदुत्वाचा मुद्दा घेवून निवडणूक रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार सागर अशोक बेग यांनीही माघार न घेता आपली उमेदवारी तशीच ठेवली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मतविभागणी झाली.
लहु कानडे हे महायुतीचे उमेदवार असल्याने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, माजी आ.चंद्रशेखर कदम, राष्ट्रवादीचे प्रवक्ता अविनाश आदिक, माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक या दिग्गज नेत्यांबरोबरच भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, देवळालीचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद नवले, राजेश अलघ, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी, प्रकाश ढोकणे, राजेंद्र पवार, केतन खोरे यांच्यासह अनेक नेतेमंडळी कानडे यांच्या प्रचारात सक्रीय होती. माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी प्रकाश चित्ते यांनी मतदार संघात यंत्रणा उभी केली होती. तर अपक्ष उमेदवार सागर अशोक बेग हे हिंदुत्वाचा मुद्दा घेवून निवडणूक रिंगणात उतरले असल्याने मतदार संघातील अनेक तरुणांनी बेग यांच्या प्रचार यंत्रणेची धुरा सांभाळली. त्यामुळे बेग यांना तिसर्या क्रमांकाची मते मिळाली. पोलीस प्रशासनाने अतिरिक्त पोलीस अधीक्षक कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुंजे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, दशरथ चौधरी, सशस्त्र सीमाबलाचे सहाय्यक कमांडर बिश्वास यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.