Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीरामपुरात आदिक ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’च्या भूमिकेत

श्रीरामपुरात आदिक ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’च्या भूमिकेत

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर तालुक्यातील कार्यकर्ते संभ्रमात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक व माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी दोन दिवस थांबा, असे सांगत ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ ची भूमिका घेतली आहे. तर माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे चिरंजीव मुळा-प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे व समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे पक्षाचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्यासोबत कोण तसेच अजित पवार यांच्यासोबत कोण अशा संभ्रमावस्थेत पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यातच आज अविनाश आदिक यांनी अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अदिती तटकरे यांची भेट घेतल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर पुढे आले. असे असले तरी त्यांनी आपली भूमिका मात्र स्पष्ट केलेली नाही. बुधवारी दोन्ही गटांच्या बैठका आहेत. ज्या बैठकीला मी हजर असेल त्यांच्यासोबत मी आहे, असे स्पष्ट करत दोन दिवस थांबा असे स्पष्ट केले.

माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनीही दोन दिवस जावू द्या, असे सांगत माझ्यादृष्टीने हा भावनिक विषय आहे, आपण दोघांनाही सोडू शकत नाही. श्री. पवार काकासमान तर अजित दादा भावासमान आहेत. ते पूर्णपणे माझ्या पाठीशी होते. असे घडायला नको होते. त्यांनी परत एकत्र यावे, असे सांगितले.

दरम्यान माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या समर्थकांनीही आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तसेच छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. उद्या होणार्‍या बैठकीसाठी थांबण्यास त्यांना सांगण्यात आले. माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे चिरंजीव मुळा-प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे यांच्यासह लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, अशोक कारखान्याचे उपाध्यक्ष पुंजाहरी शिंदे, संचालक ज्ञानेश्वर काळे, विरेश गलांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयुर पटारे, नाना पाटील, राजेंद्र कंत्रोड, अमोल ढोकचौळे, दीपक झुराळे यांचा त्यात समावेश आहे.

माजी आ. मुरकुटे व त्यांचे समर्थक सध्या कोणत्याच पक्षात नाहीत. लोकसेवा विकास आघाडीची स्थापना करून मुरकुटे यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवले आहे. असे असले तरी ते यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. त्यामुळे त्यांच्या संघटनेत पवार यांना मानणारे अनेक कार्यकर्ते आहेत. त्या पार्श्वभुमीवर त्यांच्या समर्थकांच्या या भेटीने तालुक्यातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या