श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर येथील एसटी महामंडळाची जमीन शासनाची असून, यासंबंधी 7/12 आणि 8 अ वर काही नोंदी राहिल्या असतील तर त्या 1 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून एसटी महामंडळाच्या बसस्थानकाचे काम तातडीने चालू करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिले आहेत.
आमदार हेमंत ओगले यांनी श्रीरामपूर येथील बसस्थानकाच्या रखडलेल्या कामाबाबत तसेच काही लोकांनी सदर जागेचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्या अनुषंगाने त्यांनी तातडीने परिवहन मंत्री सरनाईक यांना पत्र लिहून बैठकीचे आयोजन करण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने काल मंत्रालय येथे परिवहन मंत्री सरनाईक यांच्या दालनात सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस राज्य महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक, जिल्हा भूमी लेख अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्यासह सदर कामाचे ठेकेदार उपस्थित होते.
बैठकीमध्ये आमदार ओगले यांनी मंत्री सरनाईक यांना निदर्शनास आणून दिले की, श्रीरामपूर येथे बसस्थानकाचे काम मंजूर आहे, परंतु जागेच्या काही तांत्रिक अडचणींमुळे सदरचे काम रखडले आहे. याचाच फायदा घेऊन काही लोकांनी तेथे ताबा मारण्याचा प्रयत्न केला. त्यावर मंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा भुमिलेख अधिकारी यांना तातडीने सदर जागेच्या संदर्भातील उतार्यांवर शासनाच्या नोंदी करण्याचे आदेश दिले, व एक नोव्हेंबरपर्यंत सदर कामाला सुरुवात करण्याच्या सूचना देखील संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच श्रीरामपूर येथील बसस्थानकाचे काम चालू होणार आहे. तसेच, सदर कामात कुणी अडथळा निर्माण केल्यास संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याच्या सूचना ना. सरनाईक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिल्या आहेत.





