Friday, May 3, 2024
Homeनगरग्रामपंचायतींच्या 266 जागांसाठी आज मतदान

ग्रामपंचायतींच्या 266 जागांसाठी आज मतदान

श्रीरामपूर|ज्ञानेश गवले| Shrirampur

आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषदांबरोबरच सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणार्‍या श्रीरामपूर तालुक्यातील

- Advertisement -

27 ग्रामपंचायतींची निवडणूक आज धुमधडाक्यात होत असून तालुक्यातील नेत्यांबरोबरच गावपुढार्‍यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 26 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी 266 सदस्यांच्या जागांसाठी एकूण 577 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.

तालुक्यात एकूण 56 गावे आणि 52 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी करोना काळात मुदत संपलेल्या 27 गावांतील सर्वात मोठया बेलापूर, टाकळीभान, पढेगाव या मोठ्या गावांसह वळदगाव, मातापूर, मालुंजा बुद्रुक, बेलापूर खुर्द, मातुलठाण, सराला, घुमनदेव, एकलहरे,वडाळा महादेव, गळनिंब, भेर्डापूर, ब्राम्हणगाव वेताळ, लाडगाव, गोवर्धनपूर, मुठेवाडगाव, महांकाळ वाडगाव, गोंडेगाव, नायगाव, मांडवे, कुरणपूर, निपाणी वाडगाव आदी गावांचा आजच्या निवडणूक टप्प्यात समावेश आहे. तर खानापूर ग्रामपंचायतीच्या सर्व 9 जागा बिनविरोध निवडून आल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे.

आज होत असलेल्या निवडणूकीसाठी श्रीरामपूर तालुक्यात 102 प्रभागांतील 266 सदस्यांच्या जागांसाठी एकूण 577 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. 1087 अर्ज छाननीत वैध ठरले होते. त्यापैकी 507 जणांनी उमेदवारी मागे घेतली. आजच्या निवडणुकीसाठी तालुक्यातून पुरुष -42, हजार 161 तर स्त्रीया-39, हजार 239 असे मिळून एकूण-81 हजार 400 मतदार आहेत.

खानापूर-9, निपाणीवाडगाव -1, वळदगाव-1, गोवर्धनपूर-1, मालुंजा-1 आणि ब्राम्हणगाव येथील दोन याप्रमाणे 281 पैकी 15 जागा बिनविरोध निवडून आल्याने आज 266 जागांसाठी मतदान होत आहे.

प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या अधिपत्याखाली महसूल यंत्रणा सज्ज आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी तथा प्रभारी शहर पोलीस निरीक्षक आयुष नोपाणी, तालुका पोलीस निरीक्षक मसुद खान यांनी या पार्श्वभूमीवर अगोदरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गावागावांत शांतता समितीच्या बैठका घेतल्या आहेत.

गावकारभारी गुलदस्त्यात- या निवडणुकीनंतर गावकारभारी कोण? याची मोठी उत्सुकता लागली असून अनेक आडाखे बांधले जात आहेत. यंदा प्रथमच गावातील निवडणूकपूर्व संघर्ष रोखण्यासाठी सरपंच पदाचे आरक्षण निवडणूक झाल्यानंतर म्हणजे 25 तारखेच्या अगोदर जाहीर होणार आहे.

त्यामुळे पुढचा सरपंच कोण ? याबाबत पुर्ण अनभिज्ञता आहे.म्हणून आरक्षण जाहीर झाल्यानंतरच प्रत्येकजण कंबर कसून पंचायत ताब्यात ठेवण्यासाठी धडपड करणार आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने राजकारण निवडणुकीनंतरच तापणार आहे.

रात्रीस खेळ चाले- या निवडणुकीच्या निमित्ताने पाच वर्षांत कधी ग्रामपंचायत कार्यालयाकडेही न फिरकणार्‍या अन् गावाबद्दल फारसं सोयरसुतक नासलेल्यांचाही भाव चांगलाच वाढला आहे. काहींना निवडणूक लढवायचे. काहींना दुसर्‍याला नडायचे ,पाडायचे.. तर काहींना पडायचेही व्यवहार आपापसातील देवाण घेवाणीत ठरल्याची चर्चा ऐकायला मिळते.जाहीर प्रचार संपल्यापासून आज मध्यरात्र ते पहाटेपर्यंत घडलेल्या सर्व हालचालींद्वारे रात्रीस खेळ चाले..ची प्रचिती आली

भाऊगर्दी अन् हायटेक प्रचार- यंदा प्रथमच स्थानिक निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात आला. त्यात ऑडिओ-व्हिडिओ-डिजिटल क्लिपस -व्हॉट्स अ‍ॅप-फेसबुक-अ‍ॅनिमेशन आदींचा प्रभाव दिसून आला.

गावागावांत प्रचारात नेहमीप्रमाणे सर्व ताकद पणाला लावून भाऊगर्दी गोळा करून शक्तिप्रदर्शन करीत शह-प्रतिशह देण्यात आला.मोठ्या प्रमाणात मतपत्रिकेचे नमुने व प्रचाराचे हॅन्डबिल्स महागड्या ग्लेज्ड पेपरवर डिजिटल प्रिंटिंग केलेले दिसून आले. नव्या जुन्यांचा संघर्षाही अनुभवायला मिळतो आहे.

तालुक्यात भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे, तसेच माजी आ. भानुदास मुरकुटे, काँग्रेसचे आ. लहू कानडे, ओबीसी भाजपचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश चित्ते, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, काँग्रेसचे सरचिटणीस करण ससाणे, सचिन गुजर आदी मोठ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे समर्थक लढत आहेत. स्थानिक निवडणूक असल्याने या नेत्यांनी थेट हस्तक्षेप टाळलेला दिसून येतो.

येत्या सोमवारी 18 तारखेला सकाळी दहा वाजता निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. मात्र तोवर नेतेमंडळी आणि गावपुढार्‍यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने आमचीच सत्ता येणार असा दावा ऐकावा लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या