Saturday, January 24, 2026
HomeनगरShrirampur : श्रीरामपुरात ससाणे, बिहाणी की चित्ते; जनतेत उत्सुकता

Shrirampur : श्रीरामपुरात ससाणे, बिहाणी की चित्ते; जनतेत उत्सुकता

मुस्लिम वोट बँकेचा करिष्मा पुन्हा एकदा रंगणार का?

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

काल झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने त्याचा लाभ कुणाला होणार आणि त्याचा फटका कुणाला बसणार हीच चर्चा काल दिवसभर शहरभर होती. त्यामुळे श्रीरामपूरचे नगराध्यक्षपदी ससाणे, बिहाणी की चित्ते होणार याबाबतची उत्सुकता श्रीरामपूरकरांना लागली आहे. 80 टक्के पेक्षा जास्त मतदान होईल अशी अपेक्षा होती परंतु मयत, दुबार, तिबार तसेच बाहेरगावी असणारे मतदार यांची मोठी संख्या असल्याने त्याचा मतदानावर परिणाम झाला. त्यामुळे टक्केवारी कमी झाल्याची चर्चा सर्वच भागात होती. शहरात एकूण 80 हजार 992 मतदार होते. त्यापैकी 53 हजार 954 मतदारांनी मतदान केले.

- Advertisement -

यामध्ये मुस्लिम बहुल असलेल्या प्रभाग क्रमांक पाच सहा, सात आणि आठ या चार प्रभागांमध्ये 13995 इतके मतदान झाले आहे. उर्वरित सर्व प्रभागातून मिळून 39 हजार 999 इतके मतदान झाले आहे. कमी झालेल्या या मतदानाचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काँग्रेसचे उमेदवार करण ससाणे हे शहराच्या प्रत्येक प्रभागात परिचित आहेत तसेच माजी आमदार स्व. जयंत ससाणे तसेच माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांची राजकीय कारकीर्द ही करण ससाणे यांना लाभदायक ठरेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

YouTube video player

तर भाजपचे श्रीनिवास बिहाणी यांच्या विजयासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राबविलेली यंत्रणा व या निवडणुकीत त्यांनी घातलेले लक्ष पाहता बिहाणी ‘विनर’ ठरू शकतात असाही अंदाज काही जण व्यक्त करीत आहेत. तर तिसरे शिवसेनेचे उमेदवार प्रकाश चित्ते यांनी फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली. श्रीरामपुरातील मतदारांना हा मुद्दा किती भावला हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता नगराध्यक्षपदाचा ‘मुकद्दर का सिकंदर’ कोण होणार हे 21 तारखेला स्पष्ट होणार आहे.

मंगळवारी झालेल्या पालिकेच्या 17 प्रभागात आलेले मतदान पुढील प्रमाणे आहे –
प्रभाग 1 – 3090, प्रभाग 2 – 3256, प्रभाग 3 – 2753, प्रभाग 4 – 3484, प्रभाग 5 – 2748, प्रभाग 6 – 3269, प्रभाग 7 – 3665, प्रभाग 8 – 4273, प्रभाग 9 – 3075, प्रभाग 10 – 2856, प्रभाग 11 – 2997, प्रभाग 12 – 3011, प्रभाग 13 – 2860, प्रभाग 14 – 2895, प्रभाग 15 – 2945, प्रभाग 16 – 3391 व प्रभाग 17 – 3386.
यामध्ये सर्वात जास्त मतदान प्रभाग आठ मध्ये झाले आहे. तेथे मतदारांची संख्या देखील सहा हजारापेक्षा जास्त होती.प्रत्येक भागामध्ये चुरशीची निवडणूक झाली असून काही भागांमध्ये अपक्षांनी देखील आपले आव्हान उभे केले आहे. हे अपक्ष आता कुणाकुणाचा टांगा पलटी करतात याकडे देखील शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...