श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहर पोलिसांनी वॉर्ड नं. 07 मधील थत्ते ग्राउंड परिसरात सापळा रचून नशेसाठी वापरल्या जाणार्या मेफेंटर्मिन औषधांची विक्री करणार्या दोघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून 20 हजार 519 रुपये किमतीच्या 55 गुंगीकारक औषधांच्या बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे.
दि.17 मार्च रोजी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत शहरातील वॉर्ड नं. 07 थत्ते ग्राउंड परिसरात दोन इसम नशेसाठी वापरल्या जाणार्या गुंगीकारक मेफेंटर्मिन औषधाच्या बॉटल विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगून असल्याची गुप्त माहीती मिळाली, त्यांनी तात्काळ पोलीस पथकास थत्ते ग्राउंड परिसरामध्ये सापळा लावण्यास सांगितले. तपास पथकाने तात्काळ थत्ते ग्राउंड परिसरामध्ये सापळा लावला. यावेळी अथर्व रणजीत पाटील (वय 22, रा. पटेल हायस्कूलमागे, अमेझॉन ऑफिससमोर, वॉर्ड नं. 07, श्रीरामपूर) आणि गिरीश सुनील मुंदडा (वय 21, रा. साई सहवास अपार्टमेंट, वॉर्ड नं. 07, श्रीरामपूर) हे दोन तरुण तपास पथकास मिळून आले. अथर्व रणजीत पाटील याच्याकडे 1,569 रुपये किमतीच्या एकूण 5 बॉटल मिळून आल्या. तर गिरीश सुनील मुंदडा याच्या ताब्यात 18 हजार 950 रुपये किमतीच्या एकूण 50 बॉटल मिळून आल्या. असा एकूण 20 हजार 519 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी गु.र.नं. 197/2026, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 125, 278 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, सचिन दुकळे, अमोल गायकवाड, अजित पटारे, सागर बनसोडे, रामेश्वर तारडे, रवींद्र शिंदे, चालक सहाय्यक फौजदार राजेश सूर्यवंशी आणि बाळासाहेब गिरी यांनी ही कारवाई केली. दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव हे करीत आहेत.




