श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर तालुक्यात सर्वदूर शनिवारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे खरीपाचे मोठे नुकसान झाले आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास सुरू झालेल्या या अतिवृष्टीने रात्रभर थैमान घातले. यामुळे तालुक्यातील शेतात पाणी साचले, अनेक गावांचे रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला तर रात्रीच घरामध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
श्रीरामपूर शहर व तालुक्यात शनिवारी रात्री ढगफूटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे शहरात सखल भागात पाणी साचले होते. रेल्वे अंडरग्राऊंड पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने कॉलेज रोड परिसर, सय्यद बाबा चौक परिसरात वाहतूक खोळंबलेली होती.
तर तालुक्यातील गोदापट्टा, प्रवरा पट्टा, खंडाळा, वडाळा महादेव, खोकर-भोकर, गोंडेगाव, मातुलठाण, नाऊर परिसर, टाकळीभान, घुमनदेव, वांगी, खिर्डी, गुजरवाडी, कारेगाव, पढेगाव, कान्हेगाव, मातापूर, मालुंजा, माळवाडगाव, मुठेवाडगाव, भामाठाण आदींसह तालुक्यात सर्वदूर रात्रभर पाऊस बसरत होता. त्यामुळे तालुक्यातील अनेक ओढे-नाले तुडूंब भरुन वाहु लागले. अनेक ओढ्यांना पुर आल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले, गोंडेगाव येथे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पावसाने शेतकर्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काढणीला आलेले सोयाबीन, मका, कापूस, ऊस, फळबागा आणि चारापिके पूर्णपणे खराब झाली आहेत. अनेक ठिकाणी काढणी केलेले सोयाबीनचे पीक अक्षरशः पाण्यात वाहून गेले आहे. मातापूर येथील शेतकरी सुभाष प्रल्हाद उंडे यांच्या सोयाबिन पिकात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने त्यांना मोठे नुकसान झाले आहे. तसेच शिवाजी उंडे यांच्या शेतामध्ये काढून ठेवलेली मक्याची कणसे पाण्यामध्ये वाहुन गेली.
आमदार ओगले यांनी आम्ही सगळे मायबाप शेतकर्यांच्या सोबत आहोत, सरकारने देखील कुठल्याही नियमांचे आडकाठी न आणता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत करणे आवश्यक असल्याचे सांगितले, याबाबत कोणतीही अडचण आल्यास मला अथवा जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे उपस्थित होते. आ. ओगले यांनी खैरी निमगाव, गोंडेगाव, माळेवाडी, सराला, ब्राम्हणगाव भांड, चांदेगाव, बेलापूर बु., सातभाई वस्ती या ठिकाणी भेटी देत नुकसानीची पाहणी केली.
तालुक्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. लवकरच शेतकर्यांना शासनाच्या वतीने मदत करण्यात येणार आहे, आम्ही सर्व शेतकर्यांसोबत असल्याचे भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष दीपक पटारे यांनी सांगितले. त्यांनीही गोंडेगाव भागात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली. एकूणच श्रीरामपूर तालुक्यात शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीसदृश पावसाने अनेक गावांतील ओढे नाले एक होऊन वाहू लागले. ओढ्यांना पुर आल्याने अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरले, शेतांना नद्यांचे स्वरुप आल्याने शेतीतील उभी खरीपाचे पिके वाहून गेली. त्यामुळे शासनाने कोणतेही निकष न लावता सरसकट मदत करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकर्यांनी केली आहे.
अनेक ओढ्या नाल्यांना पूर
शनिवारी झालेल्या पावसामुळे श्रीरामपूर तालुक्यातील अनेक ओढ्या नाल्यांना पुर आले, त्यामुळे काही गावांचे संपर्क तूटला होता. उंदिरगाव-नाऊर रस्त्यावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. तर पढेगाव-कारेगाव रस्ताही वाहतूकीसाठी बंद होता.
गोंडेगाव येथील अनेक घरांमध्ये पाणी
तालुक्यातील गोंडेगाव येथे वरील बाजूने पाणी आल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. आ. हेमंत ओगले यांनी गोंडेगाव येथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
सरसकट पंचनामे करा
झालेल्या अतिवृष्टीमुळे श्रीरामपूर तालुक्यातील 100 टक्के क्षेत्र बाधीत झाले आहे. त्यामुळे शासनाने सरसकट पंचनामे करुन शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.




