देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara
देवळाली प्रवरा-श्रीरामपूर रस्त्यावर पठारेमामा फरशीजवळ ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व सिमेंट घेऊन जाणारा ट्रक यांच्यात अपघात होऊन ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यावर उलटल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
शुक्रवार दि. 21 नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास देवळाली प्रवरा कडून श्रीरामपूरकडे उसाच्या दोन ट्रॉल्या ऊस घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टर पठारेमामा फरशीजवळ आला असताना श्रीरामपूरकडून देवळालीकडे सिमेंटच्या गोण्या घेऊन येणारा ट्रक मध्ये शिरला. रस्ता अरूंद असल्याने दोन्ही चालकांनी आपआपली वाहने वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. यामध्ये ट्रक रस्त्याच्या खाली गेला. हीच अवस्था ट्रॅक्टरची झाली. अचानकपणे ब्रेक लागल्याने रस्ता उताराचा असल्याने ट्रॉल्या एकमेकांवर आदळून त्यांचा डाबरचा हुक तुटल्याने रस्त्याच्या मधोमध उलटल्याने दुतर्फा वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती.
एकीकडे नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडी संपते ना संपते तोच देवळाली प्रवरा-श्रीरामपूर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहन चालकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. अपघात होताच अपघात स्थळावरुन दोन्हीही चालक पसार झाल्याचेे समजते. या बाबत पोलिसांना घटनेची माहिती देऊनही पोलीस वेळेवर न पोहचल्याने रस्ता वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने वाहनचालकांचे मोठे हाल झाले.




