Monday, February 9, 2026
HomeनगरShrirampur : तालुक्यात मुदत संपलेल्या 27 ग्रामपंचायतीवर ‘प्रशासक राज’ सुरु

Shrirampur : तालुक्यात मुदत संपलेल्या 27 ग्रामपंचायतीवर ‘प्रशासक राज’ सुरु

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या गेली तीन वर्ष रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी डेडलाईन दिली असल्याने जानेवारी महिन्यात मुदत संंपत असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीत प्रशासकाची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दि. 9 व 10 फेब्रुवारी 2026 रोजी मुदत संपलेल्या 27 ग्रामपंचायतीची सूत्रे आता आजपासून प्रशासकाच्या हाती जाणार असल्याने सदस्य मंडळाचा कारभार संपुष्टात येणार आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका व 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या एक टप्पा पार पडला आहे. तर उर्वरीत जिल्हा परिषदांनी आरक्षण मर्यादा ओलांडल्याने या जिल्हा परिषदांच्या निवडणुका न्यायप्रविष्ठ आहेत. त्याचा फटका राज्यभर व गाव पातळीवरील ग्रामपंचायत निवडणुकींना बसला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या सदस्य मंडळाची मुदत दि.9 व 10 फेब्रुवारी 2026 ला संपत असल्याने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचे अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत. त्यांनी ते अधिकार तालुक्याच्या गटविकास अधिकार्‍यांना देऊन प्रशासकांची नियुक्ती केली आहे. पंचायत समिती, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विस्तार अधिकार्‍यांची प्रशासक म्हणून नियुक्तीचे आदेश गटविकास अधिकारी विवेक गुंड यांनी काढले आहेत.

YouTube video player

त्यानुसार नियुक्त केलेले शासकीय अधिकारी आज दि. 9 व दि.10 फेब्रुवारी रोजी प्रशासक म्हणून ग्रामपंचायतीची सूत्रे हाती घेणार आहेत. त्यानुसार 17 अधिकारी 27 ग्रामपंचातींचे प्रशासक म्हणून कामकाज आगामी होणार्‍या निवडणुकांपर्यत पाहणार आहेत. टाकळीभान व मुठेवाडगाव या दोन मोठ्या गावांची सूत्रे प्रशासक म्हणून कृषी अधिकारी अशोक खेडकर यांच्या हाती आली आहेत. बेलापूर बुद्रूक व कारेगावचे प्रशासक पं.स.चे विस्तार अधिकारी व्ही.एन. चराटे यांच्याकडे आहे. बेलापूर खुर्द, भेर्डापूर व पढेगावसाठी सा.बा. चे विस्तार अधिकारी डी.जी. ठाकरे यांची नियुक्ती झाली आहे. ब्राम्हणगाव वेताळ पी. एस. ठाकरे, एकलहरे, वळदगावसाठी सां. बां. चे कनिष्ठ अभियंता जी.व्ही. खेडकर, गळनिंबसाठी कृषी विभागाच्या वि. आ. शारदा यादव, घुमनदेव व महांकाळ वाडगावला ग्रा.पा.पु.विभागाचे कनिष्ठ अभियंता व्ही.बी. वनवे, गोंडेगाव व वडाळा महादेवसाठी सां.बां.चे कनिष्ठ अभियंता पी.एम.ठाकरे, गोवर्धनपूर, सरालासाठी कृषीच्या विस्तार अधिकारी श्रीमती एस.बी. तोडमल, खानापूरसाठी कनिष्ठ अभियंता श्रीमती अमृता रगड, खोकरसाठी जलसंधारण अधिकारी एस.बी. कुवर, कुरणपूर, मांडवेसाठी कृषी विस्तार अधिकारी दिपक मेहरे, लाडगाव, मालुंजा बुद्रूकसाठी वि.अ.शिक्षण डी.जी.त्रिभुवन, मातापूरसाठी केंद्र प्रमुख बेबी जाधव, मातुलठाणसाठी अंगणवाडी पर्ववेक्षिका श्रीमती शांता गव्हाणे, नायगावसाठी केंद्रप्रमुख राजू ईनामदार, निपाणी वाडगावसाठी जलसंधारण अधिकारी ए.आर.सोनवणे आदी प्रशासक म्हणून आज पदभार स्विकारणार आहेत. त्यामुळे या सर्व ग्रामपंचायतीत सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येऊन प्रशासकीय राज सुरु होणार आहे.

ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत आल्याने गेल्या वर्षभरापासून अनेक इच्छुक निवडणुकीच्या तयारीला लागले होते. काही सत्तेत येण्याची तयारी करीत होते तर काही पाडापाडीच्या तयारीला लागले होते. त्यामुळे गेल्या चार महिन्यापर्यंत ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले होते. मात्र, चार महिन्यापूर्वी निवडणुका लांबण्याचे संकेत मिळाल्याने अनेकांचा ताव गेला. त्यातच सरकारी कर्मचारी निवणुकांमध्ये व्यस्त असल्याने विद्यमान सरपंचांना प्रशासकीय सरपंच म्हणून संधी मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे कार्यकाळ वाढणार असल्याने अनेक सरपंच मनातल्या मनात खुशीचे मांडे खात होते. मात्र प्रशासकीय सरपंचपदी सरकारी अधिकार्‍यांच्या नियुत्या झाल्याने सरपंचाच्याही आनंदावर विरजन पडले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे औद्योगिक विकासात नाशिक घेणार भरारी

0
नाशिक | Nashik विमान प्रवास आता चैनीची नव्हे, तर आवश्यक गरज झाली आहे.  विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा औद्योगिक...