Monday, May 4, 2026
HomeनगरCM Devendra Fadnavis : उद्योजकांना त्रास देणार्‍यांना ठोकून काढणार

CM Devendra Fadnavis : उद्योजकांना त्रास देणार्‍यांना ठोकून काढणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

औद्योगिक क्षेत्रात झुंडशाही व गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही. सुपा औद्योगिक क्षेत्राची (Supa MIDC) वेगाने वाढ होत असताना काही घटक उद्योजकांना त्रास देण्याचे प्रकार करत असल्याची माहिती मिळाली आहे. हे अजिबात सहन केले जाणार नाही. अशा घटकांना ठोकून काढले जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिला. मात्र, ठोकून काढणे म्हणजे कायद्याच्या चौकटीतच कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील (Ahilyanagar Pune Highway) सुपा (ता. पारनेर) औद्योगिक क्षेत्रातील तौरल इंडिया (Taural India) या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि.8) झाले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, आ. काशिनाथ दाते, आ. विक्रम पाचपुते, महंत नामदेव शास्त्री, महंत शिवाजी महाराज, तौरल इंडियाचे प्रमुख भरत गिते उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागरिकांना उद्योगांकडून काही अडचणी असतील तर त्यांनी अधिकृत यंत्रणेकडे तक्रार करावी. मात्र, उद्योगांना दिला जाणारा बेकायदेशीर त्रास खपवून घेतला जाणार नाही. सुपा औद्योगिक क्षेत्रात नवीन उद्योग येत असताना येथे काही वाईट ‘उद्योग’ ही निर्माण होत असल्याची माहिती आहे. अशा घटनांकडे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत गांभीर्याने पाहिले जाईल. जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’, उत्पादन खर्चातील सुलभता आणि मजबूत कायदा-सुव्यवस्थेमुळे महाराष्ट्रात उद्योगवाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर औद्योगिक क्षेत्रातील अगदी लहान घटनाही गंभीर मानून त्यावर तातडीने कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्रात उद्योगवाढ होत असताना पर्यावरणाचे संरक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे. उद्योग पर्यावरणपूरक असले पाहिजेत. उद्योगवाढ आणि पर्यावरण यांचा समतोल साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यापूर्वी उद्योगवाढ प्रामुख्याने मुंबई-पुणे पट्ट्यात मर्यादित होती. आता उद्योगांचे विकेंद्रीकरण सुरू करण्यात आले असून राज्याच्या प्रत्येक भागात उद्योग पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याचा सरकारचा प्रयत्न असून उत्पादन क्षेत्र अर्थव्यवस्थेचा कणा ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्योगमंत्री उदय सामंत (Industry Minister Uday Samant) म्हणाले, दावोस गुंतवणूक परिषदेनंतर सरकार काय करते? याचे उत्तर सुपा औद्योगिक क्षेत्रातील तौरल इंडिया या एका वर्षातच उत्पादन सुरू झालेल्या प्रकल्पाने दिले आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प एका मराठी उद्योजकाने उभारला आहे. तौरल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते यांनी प्रकल्पाची माहिती देताना 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून 1,200 जणांना थेट रोजगार उपलब्ध झाल्याचे सांगितले.

नगर जिल्ह्यात 12 हजार कोटींची गुंतवणूक
दावोस गुंतवणूक परिषदेमधून उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्यातून 75 हजार जणांना रोजगार मिळणार आहे. यापैकी नगर जिल्ह्यात 12 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन 18 हजार जणांना रोजगार उपलब्ध होईल, असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. दावोस परिषदेत झालेले सुमारे 75 टक्के करार प्रत्यक्षात मार्गी लागतात, तर केवळ 25 टक्के करार भू-राजकीय परिस्थितीमुळे रखडतात, असेही त्यांनी सांगितले.

भरत गीते ‘औद्योगिक राजदूत’
‘तौरल इंडिया’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गीते यांनी दावोस परिषदेत महाराष्ट्रासाठी गुंतवणूक आणण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे कौतुक करत त्यांना महाराष्ट्राचे ‘औद्योगिक राजदूत’ संबोधले.

औद्योगिक वीजदर पाच वर्षे स्थिर
राज्यातील उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी पुढील पाच वर्षे औद्योगिक वीजदर वाढवले जाणार नाहीत, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

ताज्या बातम्या

बिचुकले

Baramati ByPoll Election 2026: बारामतीत बिचुकले, करुणा शर्मांच्या एकुण मतांपेक्षा ‘नोटा’...

0
बारामती | Baramatiदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे....