अहिल्यानगर (प्रतिनिधी)
शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रस्तरावर न घेता आपापल्या शाळेतच घ्यावी. शाळेतून केंद्रापर्यंत विद्यार्थ्यांची वाहतूक खासगी वाहनाने करणे जबाबदारीचे काम आहे. त्यामुळे शाळास्तरावर ही परीक्षा घ्यावी, अशी मागणी सर्व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्या वतीने जिल्हा परिषद सीईओंकडे करण्यात आली आहे. तसेच तसे न झाल्यास शिक्षक संघटनांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी घेवून न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुत्रांनी सांगितले. यामुळे ऐन निवडणुकीत जिल्हा परिषदेत वादाची चिन्हे निर्माण झाली आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणार्या पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची तयारी व्हावी, यासाठी शिक्षण विभाग पाच सराव परीक्षा घेणार आहे. त्यातील पहिली सराव परीक्षा जिल्ह्यातील 165 केंद्रांवर सोमवारी (दि.28) होणार असून 13 हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) फेब्रुवारी 2025 मध्ये होणार आहे. या परीक्षांची तयारी व्हावी, यासाठी 5 सराव परीक्षांचे नियोजन जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून केले आहे. या परीक्षांमधून विद्यार्थ्यांची परीक्षेबद्दलची भीती दूर होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील यांनी याबाबतची पूर्वतयारी केली आहे. ऑक्टोबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत दरमहा एक याप्रमाणे एकूण 5 सराव परीक्षांचे नियोजन केले आहे. यातील पहिली सराव परीक्षा सोमवारी (दि.28) तालुकानिहाय गटशिक्षणाधिकार्यांनी निश्चित करून दिलेल्या एकूण 165 केंद्रांवर होणार आहे.
दुसरीकडे शिक्षक संघटनांच्या म्हणण्यानूसार केंद्रस्तरावर परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थ्यांची ने-आण करणे धोकादायक असल्यामुळे व विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी शिक्षकांवर टाकल्यामुळे व अशी सुरक्षित वाहतुकीची सोय होत नसल्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थी उपस्थित ठेवता येणे शक्य नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे सोमवारच्या परीक्षेसाठी कुणीही खासगी वाहनाने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर घेऊन जाऊ नये, असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
परीक्षेबाबत जिल्हा प्रशासनाकडून याबाबत तातडीने निर्णय येणे अपेक्षित आहे. प्रशासनाकडून काहीही निर्णय आला तर सोमवारच्या परीक्षेसाठी मात्र कोणीही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर घेऊन जाऊ नये. निवडणूक आचारसंहितेमुळे वाहनांची कडक तपासणी होत असल्याने वाहतुकीसाठी खासगी वाहनाचा वापर करण्याचा धोका कोणी पत्करू नये, असे आवाहन संघटना समन्वय समितीने केले आहे.