त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी Trimbakeshwar
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांनी आज त्र्यंबकेश्वरमध्ये भेट देत पाहणी केली. त्यांनी खंबाळा अंजनेरी येथे असणारे वाहनतळ जागा, त्र्यंबक तुपादेवी फाटा, पाहिने बारी वाहनतळ जागा , रिंगरोडने आंबेडकर चौक बिल्वतीर्थ, प्रयागतीर्थ, कुशावर्त तीर्थ परिसर, इंद्रतीर्थ तलाव, अहिल्या गोदावरी संगम घाट आदी ठिकाणी त्यांनी सुमारे सहा तास पाहणी केली.
पाहणी दौर्यात जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस महानिरीक्षक दात्तात्रेय कराळे, पो. अधीक्षक विक्रम देशमाने, त्र्यंबक नगरपालिका मुख्याधिकारी श्रिया देवचके यांच्यासह विविध विभागांचे अधिकार सहभागी झाले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
गजानन महाराज चौकासमोरून श्रीचंद्रदेव घाटापासून ते पुढे परतीपर्यंत अधिकार्यांनी पायी फिरत दौरा केला. गजानन महाराज चौक, आंबेडकर चौक, शिवनेरी चौक, लक्ष्मीनारायण चौक, कुशावर्त तीर्थ या ठिकाणी येणारे भाविक, यात्रेकरू, पदाचारी मार्ग भाविकांसाठी दर्शनाला जाताना मार्ग. साधूंचे अमृत शाहीस्नानाचे मार्ग, कुशावार्तात साधूंचा स्नानासाठी जाण्याचा मार्ग, तिथून परतीचा मार्ग याची नकाशातून तसेच प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी माहिती घेतली. कुशावर्त परिसरातील कुंडाबाबत अधिक माहिती जाणून घेतली.
आयुक्त गेडाम यांनी नवीन घाट बांधावे की आहेत ते घाट कसे वापरता येतील यावर अधिकार्यांशी चर्चा केली. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेल्या गौतम तलाव, अहिल्या गोदावरी संगम अधिकार्यांनी पाहिला. या ठिकाणी कोरड्या ठाक नद्या बघत त्यांनी या घाटात कधी पाणी असते, असा प्रश्न उपस्थित केला. पावसाळ्यात पाणी असते. या ठिकाणी असलेले सिमेंट काढून पूर्ववत केल्यास पाणी राहील का? भाविकांना त्रास होईल का? याबाबत विचारणा केली. पावसाळ्यात सप्टेंबरपर्यंत पाणी असते, असे त्यांना सांगण्यात आले.
या वेळी कुशावर्त तीर्थाच्या पाठीमागे असलेल्या वस्त्रांतरगृहाची पाहणी केली. पुजारी गंगापुत्र यांनी तीर्थाची माहिती दिली. कुशावर्ताची स्वच्छता कशी करण्यात येते याबद्दल त्यांनी नगरपालिकेकडे विचारणा केली. त्र्यंंबकेश्वरला मोठी गर्दी होईल यादृष्टीने भाविकांना त्रासदायक असे नियोजन नको, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
कुशावर्तावर माध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याची सूचना गडाम यांनी अधिकार्यांना केली.यावेळी तहसीलदार, प्रांताधिकारी, नगरपालिका, महावितरण, पाणीपुरवठा आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.