नाशिक । प्रतिनिधी
रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि पुरोहित संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रामतीर्थावर आयोजित गोदा आरती भक्तिमय वातावरणात पार पडली. नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते गोदावरी मातेची आरती करण्यात आली. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध आखाड्यांचे संत-महंत, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थित भाविकांनी आपल्या मोबाईलची टॉर्च सुरू करून सामूहिक आरतीत सहभाग घेतला. हजारो मोबाईलच्या प्रकाशाने गोदाघाट परिसर उजळून निघाला.
या सोहळ्याला भक्ती चरणदास महाराज, माधवाचार्य, आखाडा परिषदेचे प्रवक्ते संजय दास, हनुमानगढीचे पुजारी हेमंत दास, ग्यानदास महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, सतीश शुल आणि आचार्य उपेंद्रजी यांची प्रमुख उपस्थिती होती. संत-महंतांच्या उपस्थितीत गोदावरी मातेचे पूजन आणि आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने आरतीत सहभाग नोंदवत गोदामातेचा जयघोष केला.
आरतीच्या निमित्ताने रामतीर्थ आणि गोदाघाट परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. घाट परिसर, मंदिरांचा परिसर आणि नदीकाठ आकर्षक विद्युत दिव्यांनी उजळून निघाला होता. त्यातच भाविकांनी मोबाईलच्या टॉर्च लावून केलेल्या सामूहिक आरतीमुळे परिसरात भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. गोदावरीच्या पात्रात विद्युत रोषणाईचे प्रतिबिंब पडल्याने परिसराचे विहंगम दृश्य अनुभवायला मिळाले. संत-महंत, धार्मिक संस्था आणि भाविकांच्या सामूहिक सहभागातून पार पडलेल्या या आरतीने गोदावरीच्या आध्यात्मिक महात्म्याचे दर्शन घडविले. उपस्थित भाविकांसाठी हा सोहळा विशेष आकर्षण ठरला.




