त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar
जागतिक कीर्तीच्या ऐतिहासिक नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा औपचारिक प्रारंभ शनिवार (दि. ३१ ऑक्टोबर) रोजी होणार आहे. या पवित्र सोहळ्यातील मुख्य ध्वजारोहणासाठी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नाशिक येथे उपस्थित राहणार आहेत, तर त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा शनिवारी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी पार पडणार असून, त्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर नगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे. या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी सायंकाळी त्र्यंबकेश्वरमध्ये धार्मिक चित्ररथांसह अत्यंत दिमाखदार आणि भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
धार्मिक चित्ररथ अन् वाद्यांचा गजर
सायंकाळी ५ वाजता गंगा गोदावरी मंदिरापासून या शोभायात्रेचा प्रारंभ झाला. विविध धार्मिक चित्ररथांवर श्रीगणेश, गंगामाई व भगवान शंकर यांच्यासह अन्य देवतांच्या मूर्ती विराजमान करण्यात आल्या होत्या. फुलांनी सजवलेली वाहने, पारंपरिक वेशभूषा, वाद्यांचा गजर आणि साधू-महंतांची उपस्थिती यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
ही शोभायात्रा गंगा गोदावरी मंदिरापासून निघून तेली गल्ली, पाटील लेन आणि त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातून मार्गक्रमण करत पुन्हा मूळ स्थानी पोहोचली. शोभायात्रेच्या सुरुवातीलाच पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावून जणू जलाभिषेकच केला. मार्गभरात स्थानिक नागरिकांनी शोभायात्रेचे फुलांची उधळण करत स्वागत केले.शोभायात्रेनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
साधू-महंत व मान्यवरांची उपस्थिती
या शोभायात्रेत नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, उपनगराध्यक्षा पल्लवी शिरसाठ, पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका, पुरोहित संघाचे पदाधिकारी, दशनामी नागा संन्यासी आखाड्यांचे साधू-महंत आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
त्र्यंबक नगरी सजली; स्वच्छता व रोषणाईवर भर
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक कुशावर्त तीर्थ आणि परिसर नयनरम्य विद्युत रोषणाई व फुलांच्या आकर्षक सजावटीने उजळून निघाला आहे. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या वतीने शहरभरातील रस्त्यांची स्वच्छता, धुपणी आणि निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. सर्वत्र निर्माण झालेल्या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे त्र्यंबकेश्वर नगरी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे.




