Friday, January 23, 2026
HomeनगरFinancial Scam : सिस्पे-इनफिनाईट घोटाळ्यात 113 कोटींची मालमत्ता फ्रिज; मुख्य आरोपी दुबईत,...

Financial Scam : सिस्पे-इनफिनाईट घोटाळ्यात 113 कोटींची मालमत्ता फ्रिज; मुख्य आरोपी दुबईत, भारतात आणण्यासाठी रेड कॉर्नर नोटीसची तयारी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यात गाजत असलेल्या आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सीबीआय चौकशीची मागणी केलेल्या बहुचर्चित सिस्पे, इनफिनाईट बिकन व तत्सम कंपन्यांच्या आर्थिक घोटाळ्यात आतापर्यंत 113 कोटी 42 लाख 32 हजार 572 रूपये इतकी रक्कम व मालमत्ता पोलिसांनी फ्रिज केली असून एमपीआयडी कायद्यांतर्गत प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. दरम्यान, दोन मुख्य संशयित आरोपी दुबईत पळून गेले आहेत. लवकरच रेड कॉर्नर नोटीस जारी करून आरोपींना भारतात परत आणण्याची प्रक्रिया वेगाने राबवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात शुक्रवारी (9 जानेवारी) सन 2025 मधील गुन्ह्यांची सांख्यिकी माहिती व विश्‍लेषण या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील यांनी या घोटाळ्याचा सविस्तर आढावा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे व अधीक्षक घार्गे यांच्याकडून घेतल्यानंतर, संपूर्ण प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुरूवारी (8 जानेवारी) जाहीर सभेतून केली होती. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांच्या तपासाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्‍नचिन्हांवर घार्गे यांनी पत्रकार परिषदेत तपासाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, सिस्पे, इनफिनाईट व इतर तत्सम कंपन्यांबाबत जिल्ह्यात चार गुन्हे दाखल असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. या प्रकरणात दोन संचालक व आठ एजंट अशा एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे.

YouTube video player

गुंतवणूकदारांच्या जबाबांनुसार घोटाळ्याची रक्कम 14 कोटी 47 लाख 98 हजार 849 रूपये इतकी दर्शवली जात असली, तरी गुंतवणूकदारांचे जबाब नोंदविले जात असून त्यात वाढ होणार आहे. तपासादरम्यान संचालक, एजंट व कंपन्यांच्या नावे असलेल्या बँक खात्यांतील 111 कोटी रूपये तसेच दोन कोटी रूपयांची स्थावर मालमत्ता मिळून एकूण 113 कोटींहून अधिक रक्कम फ्रिज करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत यासाठी एमपीआयडी कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे सादर करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

मुख्य संशयित आरोपींना अटक होत नसल्याबाबत होत असलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना घार्गे म्हणाले, या प्रकरणातील दोन मुख्य संशयित आरोपी दुबईत पळून गेले आहेत. त्यांनी तेथील नागरिकत्व मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले होते; मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हे प्रयत्न हाणून पाडले आहेत. न्यायालयाकडून त्यांना फरार घोषित करण्यात आले असून स्टँडिंग वॉरंटची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव सीआयडीमार्फत सीबीआयकडे पाठवण्यात आला असून, लवकरच रेड कॉर्नर नोटीस जारी करून आरोपींना भारतात परत आणण्याची प्रक्रिया वेगाने राबवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात सिस्पे व इनफिनाईट बिकन व्यतिरिक्त ग्रो मोअर, शेअर मार्केट तसेच विविध पतसंस्थांशी संबंधित फसवणूक प्रकरणांचे प्रमाण वाढले आहे. सन 2025 मध्ये एकूण 365 फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले असून 2024 च्या तुलनेत 76 गुन्ह्यांची वाढ नोंदवली गेली आहे. शिर्डी येथील ग्रो मोअर फसवणूक प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एमपीआयडी कायद्यानुसार 5 कोटी 48 लाख 55 हजार 952 रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. नगर अर्बन बँकेतील सुमारे 291 कोटी रूपयांच्या घोटाळ्यात आतापर्यंत तीन कोटी 15 लाख रूपये फ्रिज करण्यात आले आहेत. यामध्ये 72 स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत 34 कोटी 57 लाख 79 हजार रूपये आहे. या प्रकरणातील एमपीआयडी प्रस्तावातील एकूण रक्कम 37 कोटी 72 लाख 80 हजार रूपये इतकी आहे, असे घार्गे यांनी सांगितले.

गुन्हेगारीत घट

सन 2025 मध्ये खून, जबरी चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी यांसारख्या शरिराविरोधी व मालाविरोधी गुन्ह्यांमध्ये सन 2024 च्या तुलनेत घट झाली आहे. दुचाकी चोरी रोखण्यात सीसीटीव्ही फुटेजचा मोठा उपयोग झाल्याचे घार्गे यांनी नमूद केले. मात्र विनयभंग व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून, 15 ते 17 वयोगटातील मुलींच्या अपहरणाचे प्रमाण वाढल्याचे तपासातून समोर आले आहे. गुन्ह्यात घट नोंदवली गेली असली तरी ते उघड करण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

अवैध कत्तलखान्यांवर कठोर कारवाई

जिल्ह्यातील अवैध कत्तलखान्यांविरोधात व्यापक कारवाई करण्यात आली आहे. वर्षभरात पोलिसांनी कारवाई करून गोमांस विक्री व वाहतूक प्रकरणी 176 गुन्हे, तर प्राणी वाहतुकीचे 305 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय सराईत गुन्हेगारांच्या 12 टोळ्या हद्दपार करण्यात आल्या असून, यामध्ये गोवंश कत्तल व वाहतूक करणार्‍या सहा टोळ्यांतील 23 गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

फिंगरप्रिंट तपासात नगर दुसर्‍या क्रमांकावर

फिंगरप्रिंटच्या आधारे खून, दरोडा, जबरी चोरी, एटीएम चोरी व घरफोडी असे 40 गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. शास्त्रीय पध्दतीने गुन्हे उघड करण्यामध्ये राज्यात अहिल्यानगर जिल्ह्याला दुसरा क्रमांक मिळाला आहे. फिंगरप्रिंट विभागात केवळ एक अधिकारी व दोन अंमलदार कार्यरत असतानाही उल्लेखनीय कामगिरी झाल्याचे घार्गे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikदैनिक 'देशदूत' आयोजित गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६फला आजपासून (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी...