अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महिला आरक्षण लागू करायचे असल्यास पाच वर्षांपूर्वीच मतदारसंघांची पुनर्रचना (परिसीमन) होण्यास आमचा विरोध नाही. या पुनर्रचनेत सर्वच राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा वाढणार आहेत. त्यामुळे या विषयावर उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत असा वाद न करता, देशातील सर्व राजकीय पक्षांनी याला पाठिंबा देणे आवश्यक आहे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले. तसेच, उद्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेत शिर्डी लोकसभा मतदारसंघ खुला तर अहिल्यानगर मतदारसंघ राखीव होऊ शकतो, असा अंदाज त्यांनी हसत हसत व्यक्त केला.
दरम्यान, आरक्षण उपवर्गीकरणामुळे मातंग व बौद्ध समाजात आज तेढ निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. बौद्ध समाजात शिक्षणाचे प्रमाण जास्त असल्याने त्यांना आरक्षणाचा फायदा मिळाला आहे. त्यामुळे मातंग समाजानेही शिक्षणाची कास धरावी व सरकारनेही मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा करावा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार 2019 मध्ये एनडीएमध्ये आले असते तर 2022 मध्ये ते राष्ट्रपती झाले असते, असा गौपयस्फोटही त्यांनी केला. अहिल्यानगर येथील आंबेडकरी चळवळीचे नेते अशोक गायकवाड यांचे निधन झाले असल्याने त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वन करण्यासाठी मंत्री आठवले रविवारी नगरला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री आठवले म्हणाले, बौद्ध समाजाला शिक्षणाचे प्रमाणात आरक्षणाचा फायदा होतो. मातंग व अन्य समाजात शिक्षण कमी असल्याने त्यांना आरक्षण मिळत नाही, हे जरी खरे असले तरी उद्या आरक्षण उपवर्गीकरण करून त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा ठेवल्या, पण त्या जागांसाठी आवश्यक पात्रतेचे उमेदवार मिळाले नाही तर त्या जागा रिक्त राहतील, असे होऊ नये म्हणून मातंग समाजानेही शिक्षण प्रवाहात आले पाहिजे व सरकारनेही मातंग समाजाच्या विकासाचा आराखडा राबवला पाहिजे, असे भाष्य आठवले यांनी केले. उपवर्गीकरण करताना मातंग समाजावर अन्याय होऊ नये व त्याचबरोबर बौद्ध समाजाचेही नुकसान होऊ नये, याची काळजी घेतली जावी असेही त्यांनी आवर्जून सुचवले.
महिला आरक्षण व मतदार संघ परिसीमन विधेयक संसदेत आणले पाहिजे व सर्व पक्षांना त्याचा फायदा होणार असल्याने त्यांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे, असे स्पष्ट करून आठवले म्हणाले, सध्याचे मतदारसंघ आरक्षण 2034 पर्यंत असले तरी 2029 पासून लागू होणार्या परिसमनमध्येही आरक्षण राहणार आहे. प्रत्येक राज्यातील एक तृतीयांश जागा वाढणार आहेत. उत्तर व दक्षिण असा कुठलाही भेदभाव होणार नाही, असा दावा करून आठवले यांनी सर्व राजकीय पक्षांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. यावेळी मतदारसंघ पुर्नरचनेत शिर्डी लोकसभा मतदारसंघ खुला होणार असून अहिल्यानगर राखीव होणार असल्याचे सांगत नव्या चर्चांना तोंड फोडले आहे.
दिल्लीतील लाठीमाराची चौकशी व्हावी
कॉकरोच जनता पार्टीचे दीपके आमच्या समाजाचे आहेत व नीट परीक्षा पेपर फुटी विरोधात त्यांनी आंदोलन केले. शिक्षण मंत्री प्रधान यांनी राजीनामाही दिला. मात्र, त्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीमाराचे मी समर्थन करत नाही. त्याची चौकशी झाली पाहिजे पण त्याच वेळी शांततेत मोर्चा काढला तर लाठीचार्ज होत नाही. आम्हीही नामांतर व अन्य चळवळींसाठी शांततेत मोर्चे काढले होते, आमच्यावर कधी असा लाठीमार झाला नाही, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.
जरांगे यांना पाठिंबा पण सरकट ओबीसीला विरोध
यावेळी बोलताना आठवले यांनी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. मात्र सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला पाठिंबा नाही, असे स्पष्ट करून ज्या मराठा व्यक्तीकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे, त्याला त्याचा लाभ मिळावा, तसेच ज्यांचे उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे, त्या मराठा कुटुंबांनाही आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, असे भाष्य आठवले यांनी केले.




