Monday, August 10, 2026
HomeनगरSangamner : हायस्पीड रेल्वे मार्गासाठी संगमनेर, आंबेगाव, सिन्नरमध्ये एल्गार

Sangamner : हायस्पीड रेल्वे मार्गासाठी संगमनेर, आंबेगाव, सिन्नरमध्ये एल्गार

सर्व मंजुरी असताना काम थांबलेच कसे?- थोरात

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

पुणे-नाशिक दरम्यानचा प्रस्तावित रेल्वे मार्ग चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर आणि सिन्नर या पारंपरिक मार्गानेच नेण्यात यावा, या आग्रही मागणीसाठी संगमनेर, सिन्नर, आंबेगाव, चाकण येथे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र येत चक्काजाम आंदोलन केले. या मार्गामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक गावांना तसेच औद्योगिक पट्ट्याला थेट रेल्वे जोडणी मिळणार असल्याने प्रकल्पात कोणताही बदल करण्याऐवजी तांत्रिक अडचणींवर उपाय शोधण्याची मागणी करण्यात आली. या मार्गामुळे संगमनेर, अकोले, सिन्नर, जुन्नर, आंबेगाव, खेड, चाकण या भागाच्या सामाजिक, औद्योगिक, कृषी व आर्थिक विकासासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

नाशिक-पुणे हा रेल्वेमार्ग सरळ व्हावा याकरीता संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिकांनी क्रांती दिनी (दि.8) एकत्र येत तीन तास हिवरगाव पावसा टोलनाका येथे ठिय्या आंदोलन केले. घोषणांच्या निनादात तीन तास चक्काजाम आंदोलन झाले. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाकरीता केंद्र व राज्य सरकारच्या सर्व मंजुरी मिळालेल्या असताना हे चांगले काम थांबले कसे? असा सवाल करताना जेथे रेल्वेचे काम थांबले तेथूनच काम सुरू करा असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी करत सरळ मार्गेच हा रेल्वे प्रकल्प झाला पाहिजे अशी आग्रही मागणी केली.

नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी, शेतकरी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोको झाला. तीन तास झालेल्या या आंदोलनासाठी संगमनेरसह अकोल्यातून अनेक नागरिक उपस्थित होते. रेल्वे आमच्या हक्काची, नाशिक-पुणे सरळ रेल्वे झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. रिमझिम पावसामध्येही आंदोलनकर्ते रस्त्यावर बसून होते. याप्रसंगी पुढे बोलताना माजी मंत्री थोरात म्हणाले, नाशिक-पुणे सरळ रेल्वेकरीता आपण सातत्याने पाठपुरावा केला. 2019 मध्ये सरकार सत्तेवर आल्यानंतर अधिक पाठपुरावा करताना स्वर्गीय अजित पवार यांनी सुद्धा यामध्ये मदत केली. केंद्र सरकार, नीती आयोग, राज्य सरकार, रेल्वे या सर्व विभागांच्या या सरळ मार्गासाठी मान्यता मिळालेल्या आहेत. राज्य सरकारने 1000 कोटी रुपये रेल्वेला दिले, त्यानंतर भूसंपादन सुरू झाले. गोल्डन ट्रँगलसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या सरळ रेल्वे मार्गाचे काम थांबण्याचे काय कारण आहे ते कळत नाही. या अत्यंत चांगल्या कामात कुणी खोडा घातला? हा सवाल करताना सर्व मंजुर्‍या मिळताना जीएमआरटीची कोणतीही अडचण आली नव्हती. आताच कशी अडचण आली असा प्रश्न त्यांनी केला. याचबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता त्यांनी साईबाबांचा चांगल्या कामाला आशीर्वाद असतो, चांगल्या कामात कुणी राजकारण करू नये अशी टीका केली. तर काही मंडळी नेहरू गार्डनच्या रेल्वे पलिकडे जात नाही अशी नाव न घेता आमदार अमोल खताळ यांच्यावर टीका केली.

शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्याप्रति आम्हांला आदर आहे. परंतु समिती नेमून पुन्हा शून्यापासून काम सुरू होणार आहे. त्यामुळे झालेले काम वाया जाणार आहे. समिती आली म्हणजे धोका आहे. हा खेळ जनतेच्या भावनेशी आहे विकासाशी आहे. या सरळ रेल्वे मार्गामुळे देशाशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. येथील शेतकरी, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी, तरुण यांना मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. भविष्यातील पिढ्यांच्या विकासासाठी होणार्‍या या रेल्वेमध्ये कोणीही राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असे आवाहन करताना ही रेल्वे मार्गे सरळच झाली पाहिजे. याचबरोबर जेथे रेल्वेचे काम थांबले तेथूनच सुरू करा अशी आग्रही मागणी त्यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केली आहे.

पद्मश्री रघुवीर खेडकर म्हणाले, मी कलावंत म्हणून नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्ग झाली पाहिजे अशी आग्रही मागणी करत आहे. हे संगमनेरच्या प्रवरेचे पाणी आहे. संगमनेरचे रक्त आहे ते थांबत नाही. आमची प्रगती कोणी थांबवू शकत नाही. सरळ रेल्वे मार्गासाठी सर्व जातीधर्माचे लोक एकत्र आले आहेत. साईबाबा आमच्या हृदयात आहेत, भावनिक शब्द वापरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. बस झाली तुमची दिशाभूल करण्याची पद्धत, हक्काची रेल्वे मिळाली पाहिजे असा सांगताना विकासाला कोणी अडवा येत असेल तर त्याला अडवा करा असे आवाहनही त्यांनी केले. तर नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्ग हा नैसर्गिक आहे. मात्र संगमनेर तालुक्याचा विकास थांबवण्यासाठी काही मंडळींनी जाणीवपूर्वक या मार्गामध्ये बदल केला आहे. नवीन लोकप्रतिनिधी संगमनेरच्या बाजूने कधी बोलत नाहीत. हा लढा भविष्यातील पिढ्यांसाठी असून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. रेल्वेमुळे विकासाचा मोठा टप्पा गाठला जाणारा असून केंद्र सरकारने जनतेचा आवाज ऐकून तातडीने सरळ मार्गे रेल्वे करावी असे आवाहन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. यावेळी अनेकांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. शेवटी प्रांताधिकारी अरुण उंडे व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी निवेदन स्वीकारले.

दरम्यान, चाकण औद्योगिक वसाहतीसह आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर उत्पादित होणारा शेतीमाल प्रमुख बाजारपेठांपर्यंत वेगाने पोहोचविण्यासाठी तसेच या भागातील विद्यार्थी, व्यावसायिक आणि नागरिकांच्या प्रवासासाठी पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग अत्यावश्यक आहे. या रेल्वेमार्गाबाबत जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले असून, रेल्वेमार्ग मंजूर होईपर्यंत आपला लढा सुरूच राहील, अशी ग्वाही राज्याचे माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

‘ती’ बातमी कळताच आंदोलक आक्रमक…
नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्गासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गावर शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होते. तसेच संगमनेर, सिन्नर, नारायणगाव, आळेफाटा, चाकण या सर्व ठिकाणी सुरू होते. केंद्र सरकारपर्यंत या आंदोलनाची धग पोहोचल्यानंतर आमदार तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही बातमी माध्यमांवर झळकल्यानंतर संगमनेरमधील आंदोलकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. आंदोलनस्थळी कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. तेव्हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, संघर्ष आमच्या रक्तात आहे. स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा आम्हांला लाभला असून अटकेची भीती आम्हाला नाही. सरकारने न्याय बुद्धीने काम करावे. हे आंदोलन जनतेचे असून रेल्वेमार्ग सरळ झाला पाहिजे अशी मागणी केली. आंदोलनकर्त्यांची आक्रमकता पाहून माजी मंत्री थोरात, माजी आमदार डॉ. तांबे, डॉ. जयश्री थोरात यांनी सर्वांना शांत केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नाशिक-पुणे रेल्वेसाठी आंदोलनाची घाई कशासाठी?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नाशिक-पुणे रेल्वेमार्गासाठी संगमनेर येथे सुरू असलेल्या सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलनावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी (दि. 9) नाराजी व्यक्त केली. नाशिक-पुणे रेल्वे...